निम्मा डिसेंबर महिना उलटत आला तरी मेहरुण बोरांची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:43 AM2019-12-13T11:43:11+5:302019-12-13T11:43:19+5:30

अति पावसामुळे हंगाम लांबणीवर : दिवसेंदिवस झाडांची संख्या होतेय कमी

There is still waiting for mehrun bore | निम्मा डिसेंबर महिना उलटत आला तरी मेहरुण बोरांची प्रतीक्षाच

निम्मा डिसेंबर महिना उलटत आला तरी मेहरुण बोरांची प्रतीक्षाच

googlenewsNext

जळगाव : मेहरुणच्या बोरांचे उत्पादन यंदा अति पावसामुळे लांबणीवर पडले असून निम्मा डिसेंबर महिना उलटला तरी ही बोरं पुरेशा प्रमाणात बाजारात आलेली नाही. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यात येणाºया या बोरांची यंदा वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे खवय्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्यभरात मागणी
जळगावातील मेहरुण परिसरात शेकडो वर्षांपासून मेहरुण बोरं पिकतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात या बोरांची झाडे असल्याने त्यांचे नाव मेहरुणची बोरं पडली. या बोरांना मोठी मागणी असल्याने व्यापारी वर्ग येथे थेट झाडांची बोली लावून ठराविक क्षेत्रफळातील झाडे घेऊन तेथील बोरांची विक्री करतात. एकदा हे बोरं खाल्ले की ते पुन्हा प्रत्येक जण मागणारच अशी ख्याती असलेल्या या बोरांना राज्यभरात मागणी वाढली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह परिसरातील जिल्हे तसेच मुंबई, पुणे येथेही ही बोरं पोहचली. आजही त्यांना राज्यभरात मागणी आहे.
अति पावसाचा फटका
यंदा अति पावसामुळे इतर पिकांसह मेहरुणच्या बोरांनाही फटका बसला आहे. तसे ही बोर नोव्हेंबर महिन्यातच बाजारात दाखल होतात. मात्र यंदा डिसेंबर महिना उजाडला तरी ही बोर दिसत नसल्याने ग्राहक या बोरांची विचारणा करीत आहे. यंदा चांगला पाऊस झाला व बोरांच्या झाडांना फुलोराही चांगला आला. मात्र त्यानंतर अतिपावसामुळे आलेला बोरांचा बहर झडून पडला. परिणामी बोरांचे उत्पादनही लांबणीवर पडले असल्याचे सांगितले जात आहे.
बोरं नामशेष होण्याच्या मार्गावर
यंदा अति पावसामुळे या बोरांचे उत्पादन घटले आहे, सोबतच दिवसेंदिवस या बोरांच्या झाडांची संख्याही कमी होत असल्याने बोरांची आवक कमी होत आहे. मेहरुण परिसरात ज्या भागात या बोरांची झाडे होती त्या भागात दिवसेंदिवस प्लॉट पाडले जाऊन रहिवास क्षेत्र वाढत आहे. परिणामी झाडांची संख्या कमी होऊन ही बोर नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
२५ ते ३० शेतकऱ्यांकडे झाडे शिल्लक
मेहरुण परिसरात असलेल्या प्रत्येक शेतात मेहरुण बोरांची झाडे होती. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचा मेहरुण बोरांची विक्री हाच प्रमुख व्यवसाय होता. मात्र दिवसेंदिवस या बोरांच्या झाडावर कुºहाड चालविली जात असल्याने आता केवळ २५ ते ३० शेतकºयांच्या शेतात ही झाडे शिल्लक आहे.
२५० झाडांचे जतन
एकीकडे मेहरुण परिसरात ही बोरं नामशेष होत असताना जैन हिल्स परिसरात या बोरांच्या झाडांचे जतन केले जात आहे. टेकडी परिसरात असलेल्या या उद्योगाच्या उभारणीवेळी तेथे असलेल्या मेहरुण बोरांची झाडे न तोडता ती तशीच टिकवून ठेवली. यातील काही झाडे तब्बल ५० वर्षांपूर्वीची असून त्यांच्यासह जुन्या-नव्या सर्वच झाडांची येथे दररोज देखभाल केली जात आहे. त्या झाडांना दररोज पाणी देणे, त्यांची मशागत करणे अशी सर्व कामे नियमित करून झाडे टिकवून ठेवण्यात आली आहे.
शेतकºयांना देणार मेहरुण बोरांची रोपं
दोन वर्षापासून जैन हिल्स परिसरात मेहरुण बोरांची रोप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात यश आले असून ही रोपे जैन हिल्स परिसरात लावली जात आहे. सध्या १०० ते १५० रोपे तयार झाली असून पुढील वर्षापर्यंत एक हजार रोपे तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आली. ही रोपे शेतकºयांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

यंदा अति पावसामुळे बोरांचा आलेला बहर वाया गेला. त्यामुळे मेहरुण बोरांचा हंगामही लांबला आहे. साधारणत: डिसेंबर महिन्याच्या शेवटी ही बोर पुरेशा प्रमाणात बाजारात येतील. जैन हिल्सवर मेहरुणच्या बोरांच्या झाडांचे जतन केले जात आहे.
- डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन व विकास विभाग, जैन उद्योग समूह.

मेहरुण परिसरात पूर्वी प्रत्येक शेतात मेहरुण बोरांची झाडे होती. आता दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे काही दिवसात ही बोरं नष्ट होतात की काय अशी शंका वाटते.
- प्रशांत नाईक, नगरसेवक, मेहरुण परिसर.

कमी पावसामुळे मेहरुणची बोरं अजून पुरेसा प्रमाणात बाजारात आलेली नाही. त्यामुळे इतर बोर आणून ती विक्री करावी लागत आहे.
- दिलीप चौधरी, विक्रेते.

Web Title: There is still waiting for mehrun bore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव