Theft of a bike from a closed house | बंद घरातून केली दुचाकीची चोरी

बंद घरातून केली दुचाकीची चोरी

भुसावळ : घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरचा कडिकोयंडा तोडून दुचाकी चोरी केल्याची घटना मंगळवारी १३ रोजी सकाळी शहराजवळील साकरी फाटा परिसरात घडली. साकरी फाटा परिसरातील रहिवासी इंदूबाई मधुकर चौधरी या गेल्या सहा महिन्यांपासून पुणे येथे आपल्या मुलाकडे राहिवासासाठी गेल्या आहेत. दरम्यान, घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दुमजली घराच्या समोरील लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून, दुसऱ्या दरवाजाचेही कुलूप तोडले व घरात प्रवेश करीत कपाटातील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. तसेच गॅस सिलेंडर आणि दुचाकी चोरुन नेली. सकळी घराचे कुलूप तोडल्याचे पाहून चोरी झाल्याची बाब शेजारील रहिवाशांच्या लक्षात आली. या घटनेबाबत इंदूबाई चौधरी यांच्या मुलास शेजारच्यांनी ही माहिती दिली असून, ते पुण्यातून भुसावळकडे रवाना झाले आहेत. घरी आल्यानंतर आणखी काय चोरी झाले याची माहिती घेऊनच बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान वरवर पाहता या घरातून दुचाकी व गॅस सिलींडर लंपास झाल्याचे चौधरी यांच्याशी बोलणे झाल्यानुसार समजते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त या भागात घालावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Theft of a bike from a closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.