धक्कादायक, जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसाला तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:58 PM2020-02-22T12:58:31+5:302020-02-22T12:59:05+5:30

ब्लॅकस्पॉटवर उपाययोजनाच नाही, सर्वाधिक अपघात पारोळा ते नशिराबाद दरम्यान

Shocking, three victims every two days in Jalgaon district | धक्कादायक, जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसाला तीन बळी

धक्कादायक, जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसाला तीन बळी

Next

सुनील पाटील
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघातांची संख्या भयंकर वाढत चालली असून सरासरी दिवसाला तीन अपघात होत आहेत तर दोन दिवसात तीन जणांचा या अपघातात बळी जात आहे. एका दिवसाला अडीच व्यक्ती जखमी होत आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्टÑीय महामार्गावर पारोळा ते नशिराबाद या दरम्यान होत आहेत. याच महामार्गावर शहरातील खोटे नगर परिसर व नशिराबादनजीकचा तरसोद फाटा हे दोन ब्लॅक स्पॉट प्रशासनाने जाहीर केलेले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात ८३५ अपघात झाले तर त्यात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
ज्या जागेवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपघात व तीन जणांचा मृत्यू झाला असेल तर तो ब्लॅक स्पॉट समजला जातो. आरटीओ, पोलीस व बांधकाम विभागाच्या संयुक्त समितीने पाच वर्षापूर्वी ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. चाळीसगावजवळ मेहुणबारे रस्ता हा एक ब्लॅक स्पॉट जाहीर झाला आहे.
पाच वर्षापूवीर् म्हणजे २०१५ मध्ये जिल्ह्यात ९०० अपघात झाले होते, त्यात ४६८ जणांचा मृत्यू झाला होता तर १५०८ जण जखमी झाले होते. त्यानंतर अपघाताची संख्या व ठार झालेल्यांची संख्या आणखीनच वाढली, शिवाय सातत्याने अपघात होण्याच्या ठिकाणातही वाढ झाली आहे. अपघाताची कारणे काहीही असली तरी त्यात जीव जाणाऱ्या व्यक्तींची संख्या नक्कीच चिंताजनक आहे.
२०१९ या वर्षात सर्वाधिक २ हजार ८५६ अपघात हे मुंबईत झाले असून त्यात ४०५ जण ठार झाले आहेत. सर्वात जास्त ८७३ जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल ८५५ जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर असून तेथे ७८३ जण ठार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५ अपघातात ५३१ जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले आहेत. २०१८ या वर्षात राज्यात ३५ हजार ७१७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू तर ३१ हजार २६५ जण जखमी झाले होते.
ठार झालेल्यांमध्ये तरुणांचीच सर्वाधिक संख्या
आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.
हे आहेत ब्लॅक स्पॉट
१) गुजराल पेट्रोल पंप ते इच्छादेवी चौक
२) टीव्ही टॉवर ते नशिराबाद
३) खडकी फाटा ते चिंचगव्हाण
(ता. चाळीसगाव)
राज्यात वर्षभरात १२ हजार ५६५ जणांचा मृत्य
राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले, त्यात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला असून २८ हजार ९८९ जण गंभीर जखमी झाले आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यात ८३५ अपघात झाले तर त्यात ४५४ जण ठार झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात १० टक्के घट होणे अपेक्षित आहे, राज्यात ८ तर जिल्ह्यात ९ टक्के घट झाली आहे.
अपघाताची वाढती संख्या लक्षात घेता चालकांनीच स्वत:साठी नियमांची शिस्त लावावी. पोलीस व इतर विभाग आपले काम करीत राहतील. आपला स्वत:चा जीव व आपल्यावर अवलंबून राहणारे कुटुंब याची जान ठेवून आपणच काळजी घेतली पाहिजे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षकू

Web Title: Shocking, three victims every two days in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव