गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला फारसे महत्त्व नव्हतं, सरकार फक्त भाजपचे होते : मंत्री जयंत पाटील यांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 03:35 PM2021-02-12T15:35:07+5:302021-02-12T15:35:34+5:30

चोपडा नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन सोहळ्यात मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Shiv Sena was not very important in the last government, the government was only of BJP: Minister Jayant Patil's BJP tola | गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला फारसे महत्त्व नव्हतं, सरकार फक्त भाजपचे होते : मंत्री जयंत पाटील यांचा भाजपला टोला

गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला फारसे महत्त्व नव्हतं, सरकार फक्त भाजपचे होते : मंत्री जयंत पाटील यांचा भाजपला टोला

Next

 

चोपडा : महाराष्ट्रात गेल्या पंचवार्षिक काळात भाजप आणि शिवसेना एकत्र असली तरी सरकार फक्त भाजपचे होतं. शिवसेनेला फारसं महत्त्व नव्हतं, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला हाणला. ते चोपडा येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटन आणि लोकार्पणप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
    गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला फारसे महत्त्व नव्हते असं म्हटल्याबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जयंत पाटील यांचे भाषण थांबवून म्हटले की, तुम्ही आमच्यात झगडा लावू नका. आमची चोपडा नगरपालिकेत वेगळी आघाडी आहे. भाजपसह एकत्र आहोत असे म्हटले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मी चोपडा नगरपालिकेचा विषय सांगत नसून महाराष्ट्राचा विषय बोलत आहे असे म्हटले. यावर मोठ्याने हशा पिकला.
येथील मच्छी मार्केट लगत असलेल्या चौकात ९० लाख रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे. त्या सभागृहाचे दुपारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार लता सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अल्पसंख्याक सेलचे जळगाव येथील गफ्फार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड.घनश्याम पाटील, पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, अक्रम तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,  जिल्हा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, रमेश शिंदे, तहसीलदार छगन वाघ, धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन व्यासपीठावर होते.
    जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलताना म्हणाले की, गुळ प्रकल्पाच्या २००८ पासून संपादणूक झालेल्या जमिनीचा मोबदला देण्याबाबत उद्याच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन.  गुळ प्रकल्प यालाच पूर कालव्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार लता सोनवणे यांनी केली असल्याने त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि चोपडा तालुक्याला सर्वाधिक फायदा असलेल्या पाडळसरे धरणाच्या बांधकाम पूर्णत्वासाठी आणि गती देण्यासाठी पावले टाकायचे ठरविले आहे. हा प्रकल्प लहान असला तरी याचा फायदा खूप मोठा आहे. महत्त्वाचा प्रकल्प असल्याने या प्रकल्पास प्राधान्य देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असेही ते म्हणाले. पालिकेच्या विकास कामासंदर्भात पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील निश्चितच नगरपालिकेला मदत करतील. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी मांडलेल्या प्रास्ताविकातून नगरपालिकेचे काम व्यवस्थित सुरू असल्याचे ते म्हणाले.
जयंतराव पाटील आपण साखर कारखान्याविषयी बोलावे, अरुणभाई गुजराथी
दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना साखर कारखान्यावर ते बोलत नसल्यामुळे व भाषण आटोपते आल्याचे लक्षात घेऊन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी मध्येच त्यांचे भाषण थांबवले आणि जागेवर उठून आपण आमच्या चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात काही तरी बोलावे, अशी विनंती त्यांनी केली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चोपडा साखर कारखान्यासंदर्भात लवकरच पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने बैठक लावावी, अशीही मागणी अरुणभाई गुजराथी यांनी भाषण थांबवून केल्याने काही वेळ जयंतराव पाटील यांचे भाषण थांबले होते. अरुणभाईंच्या या मागणीनंतर जयंत पाटील म्हणाले की, सध्या कारखाने जुने झाले असल्याने कारखान्यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी पथक पाठवणार होतो. मात्र चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शक्य असेल ती मदत मी करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन देऊन त्यांनी त्यांचे भाषण संपविले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि अल्पसंख्याक सेलचे नेते हाजी गफ्फार मलिक यांचेही भाषण झाले.
सूत्रसंचालन शिक्षक संजय बारी यांनी, प्रास्ताविक मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आणि आभार गटनेते जीवन चौधरी यांनी मानले.
पालकमंत्री व खासदार अनुपस्थित
या शासकीय कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अध्यक्ष होते. मात्र गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यासह रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांचीही अनुपस्थिती व्यासपीठावर दिसून आली.
उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी यांची उघड नाराजी
 कार्यक्रम आटोपल्यानंतर चोपडा उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी यांनी त्यांची पालिकेच्या कारभाराविषयी जाहीर नाराजी बोलून दाखवली. कारण या कार्यक्रमात त्यांना कोणतेही स्थान दिलेले नसल्याने त्यांनी बोलून दाखविले. पालिका एकतर्फी चालत असल्याने कोणत्याही कामासाठी विश्वासात घेतले जात नाही, असेही ते यावेळी बोलत होते. उपनगराध्यक्ष असूनही त्यांना व्यासपीठावर स्थान मिळाले नाही. यासह एकाही मान्यवरांचे स्वागत उपनगराध्यक्ष असूनही त्यांच्या हस्ते न झाल्याने त्यांची उघड नाराजी दिसून आली. ते व्यासपीठापासून लांब सर्वसामान्य नागरिकांमध्ये थांबलेले होते.

Web Title: Shiv Sena was not very important in the last government, the government was only of BJP: Minister Jayant Patil's BJP tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.