'सैराट झालं जी'... एकाच वर्षात जिल्ह्यातील ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:54+5:302021-02-25T12:22:49+5:30

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही ...

In the same year, 996 girls were recruited in the district; 745 girls were searched | 'सैराट झालं जी'... एकाच वर्षात जिल्ह्यातील ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचाही समावेश

'सैराट झालं जी'... एकाच वर्षात जिल्ह्यातील ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचाही समावेश

googlenewsNext

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही आपला मुलगा पळून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात विवाहित महिला व नवविवाहित तरुणींचाही समावेश आहे. असे असले तरी ७४५ मुली तर ३२३ मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २५१ मुलींचा शोध लागलेला नाही.

जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ४ हजार ८२८ हरविलेल्या, पळविलेल्या महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळे ही संख्यादेखील कमी नाही. बहुतांश प्रकरणात महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते.

दरम्यान, परत आलेल्या महिला व मुलींनी आपल्या घरी परत न जाता प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. अपवादात्मक परिस्थितीत महिला व मुली माघारी कुटुंबाकडे गेलेल्या आहेत. हरवलेल्या व पळविलेल्या एकूण महिला व मुलींची पाच वर्षातील संख्या ४ हजार २२८ इतकी असून त्यापैकी ३ हजार ५२२ महिला व मुली परत आलेल्या आहेत. १ हजार ३०६ महिला व मुली अद्यापही परत आलेल्या नसल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. दरम्यान, एप्रिल ते जुलै या कोरोनाच्या चार महिन्यात ११३ मुलींनी पलायन केले आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी -१०२

फेब्रुवारी -१०७

मार्च -८७

एप्रिल -१२

मे -१९

जून -३४

जुलै -६८

ऑगस्ट -११०

सप्टेंबर -१२२

ऑक्टोबर -१११

नोव्हेंबर -९७

डिसेंबर -१२७

कोणत्या वर्षात किती?

२०१८ : ८३१

२०१९ : ९८२

२०२० : ९९६

२५१ मुलींचा शोध लागेना

गेल्या वर्षी जिल्ह्यातून पलायन केलेल्या ९९६ पैकी ७४५ मुलींचा शोध लागला आहे तर २५१ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. ज्या मुलींचा शोध लागला आहे, त्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या बहुतांश मुलींनी पालकासोबत जाण्यास नकार दिला आहे तर १८ वर्षाच्या खालील मुलीही काही बालनिरीक्षणगृहात तर काही मुली पालकांकडे गेल्या आहेत.

६५८ मुलेही बेपत्ता

जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षाच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यापैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे. यातील बहुतांश मुले ही पालकांकडे गेली आहेत. मुलांच्या पालकांनी मुलींचा स्वीकार केला आहे. काही जणांना तर दोघांच्याही पालकांनी नाकारले, त्यामुळे त्यांनी जिल्हा सोडून इतरत्र संसार थाटला आहे.

कोट....

मुले, मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. आपला पाल्य काय करतो, याकडे पालकांनीच सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस आपले काम करतीलच. अनेक मुले, मुली शोधूनही आणल्या आहेत. मात्र काही बाबतीत कायद्याने हात बांधलेले असतात. सज्ञान नसलेले मुलं, मुली पालकांच्याच स्वाधीन केलेले आहेत. मुलामुलींचे विषय आपण स्वत:च गांभीर्याने घेऊन पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: In the same year, 996 girls were recruited in the district; 745 girls were searched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.