एलसीबीच्या पोलिसांवरही रोखला होता राहूलने पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:41+5:302021-01-15T04:14:41+5:30

जळगाव : कारागृहात सुशील मगरे व इतरांना गावठी पिस्तूल पुरविल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आनंद उर्फ राहुल गोपाळ सोनवणे (पाटील) ...

Rahul had also stopped the pistol at the LCB police | एलसीबीच्या पोलिसांवरही रोखला होता राहूलने पिस्तूल

एलसीबीच्या पोलिसांवरही रोखला होता राहूलने पिस्तूल

Next

जळगाव : कारागृहात सुशील मगरे व इतरांना गावठी पिस्तूल पुरविल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आनंद उर्फ राहुल गोपाळ सोनवणे (पाटील) २२, रा.शिंदखेडा, जि.धुळे याची धुळे व नंदूरबार जिल्ह्यात प्रचंड दहशत असून याच गुन्ह्यात त्याला यापूर्वी अटक करण्यासाठी गेलेल्या एलसीबीच्या पोलिसांवरही त्याने पिस्तूल रोखला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्याशिवाय शिंदखेडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे, तो तेथे राजरोसपणे फिरत असतानाही स्थानिक पोलिसांची त्याला अटक करण्याची हिंमत झाली नाही.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन दिवस यशस्वी सापळा लावून राहुल याला बुधवारी अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राहुल याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल असून पिस्तूलच्या बळावर तो दहशत माजवित असल्याने त्याच्याविरुध्द कारवाई करायला पोलीसही दचकतात, त्यामुळे त्याला आतापर्यंत अटक झालेली नव्हती. २५ जुलै २०२० रोजी कारागृहातून पलायन केलेल्या बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील अशोक मगरे (३२,रा.पहूर, ता.जामनेर), सागर संजय पाटील(२३,रा.अमळनेर) व गौरव विजय पाटील (२१,रा.अमळनेर) यांना मदत करणारा जगदीश पुंडलिक पाटील (१९,रा.पिंपळकोठा, ता.पारोळा)असे चौघे जण त्यादिवशी शिंदखेडा येथे राहुल याच्याकडे गेले. त्या दिवशी त्यांनी त्याच्या शेतातच मुक्काम केल्याचेही आता उघड झाले आहे.

काकांनी घेतले दत्तक..

मुलबाळ नसल्याने राहुल याला काकांनी दत्तक घेतले आहे. आता तो त्यांच्यावरही वरचढ ठरला असून शिंदखेडा येथील अनेक प्रतिष्ठीत नागरीकांना त्याने पिस्तूल लावून धमकावले आहे, मात्र तक्रार द्यायला कोणीच पुढे आलेले नाही. पिस्तूल रोखल्याबाबतचे त्याचे काही व्हीडीओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. अवघ्या १६ व्या वर्षापासून तो गुन्हेगारीकडे वळला आहे. याच गुन्हेगारी व दहशतीच्या बळावर त्याला राजकारणात प्रवेश करायचे असल्याचेही तपासात पुढे आले आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे त्याने अनुकरण केल्याचे काही घटनांवरुन दिसून येते.

जळगावचे पथक फिरले होते माघारी

याच गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक काही महिन्यापूर्वी त्याला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा तो पथकाच्या हाती लागला होता, मात्र त्याने पथकावर थेट पिस्तूल रोखून पळ काढला होता. पाठलाग करुनही तो पथकाच्या हाती लागला नव्हता. धुळे, नंदूरबार व शिंदखेडा येथील पोलिसांना तो अनेक गुन्ह्यात पाहिजे आहे.

Web Title: Rahul had also stopped the pistol at the LCB police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.