Plastic wrap fitted with KTware so as not to waste water | के.टी.वेअरचे पाणी वाया जाऊ नये यासाठी लावले प्लॅस्टिक आवरण
के.टी.वेअरचे पाणी वाया जाऊ नये यासाठी लावले प्लॅस्टिक आवरण

ठळक मुद्देभोरटेक येथे महिलांसह ग्रामस्थांनी केले जलपूजनकजगाव येथे तितूर नदीत आले चार वर्षात पहिल्यांदा पाणीकजगावच्या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला

प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : सर्व दूर पावसाचा हाहाकार माजला, नद्या-नाले ओसंडून वाहिले. मात्र कजगावची तितूर नदी कोरडीच होती. २० रोजी कोरड्या तितूर नदीला अनेक अडथळे पार करीत चक्क चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याच्या धारीचे नदीत आगमन झाले. या पाण्याच्या स्वागताला सारेच आतूर झालेले होते म्हणूनच भोरटेक येथे महिला व ग्रामस्थांनी जलपूजन केले, तर कजगावच्या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला. या दोन्ही गावात नदीवर तोबा गर्दी झाली होती.
पाटणादेवीजवळ उगम असलेल्या तितूर नदीस कजगाव परिसरात गेल्या चार वर्षांपासून पाणीच आलेले नव्हते. यामुळे तितूर किनाऱ्यावरील बागायती संपुष्टात आली होती. पाणी प्रश्नदेखील बिकट झाला होता. चार वर्षांत नदीचे रूपांतर ओस जमिनीसारखे झाले होते.
आणि लोकवर्गणीतून नदी नांगरली
कजगाव येथे तितूर नदीचे रूपांतर ओस जमिनीसारखे झाल्याने दिनेश पाटील व ग्रामस्थ एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून संपूर्ण नदीचे खोलीकरण करत पूर्ण नदी नांगरली होती. मात्र चक्क पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील या नदीला पाणी न आल्याने या नदीने हिरव्या रानात रूप परिवर्तन केले होते. सर्व दूर हिरवेगार गवत नजरेस पडत होते.
अनेक अडथळे
तितूर नदीवर अनेक ठिकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आल्याने या नदीचे पाणी पुढे सरकतच नाही. यामुळे कजगावसह सात खेडे हे तितूरच्या पाण्यापासून वंचित होते. दि.१९ रोजी झालेल्या पावसामुळे तसेच इतर सिमेंट बंधारे तुडुंब भरल्याने तितूरची धार कजगावपर्यंत पोहचली आहे. जेमतेम आलेल्या या पाण्याचा साठोबा कजगावच्या के.टी. वेअरमध्ये व्हावा, त्याला गळती लागू नये यासाठी ते पाणी कजगावात पोहचण्याच्या आधीच कजगावच्या युवकांनी या के.टी.वेअरच्या प्लेटांना प्लॅस्टिक कागदाचे आवरण चढवत पाणी गळतीपासून बचाव करण्यासाठी तयारी केली, तर तब्बल चार वर्षांनंतर आलेल्या पाण्याचे भोरटेक येथे महिलांनी जलपूजन केले. याप्रसंगी पूर्ण गाव नदीमध्ये जमले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.