‘पीए’नामा : अर्थात चहापेक्षा किटली गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:57 PM2020-09-13T14:57:23+5:302020-09-13T14:58:07+5:30

...आता एरंडोली राजकारणाचा पोत बदलला आहे. बेरजेच्या राजकारणापेक्षा आता वजाबाकीच अधिक होत आहे. सत्ताधारी, विरोधक हे असणार आहेतच, पण पक्षांतर्गत गटबाजी एवढी वाढली आहे की, एकमेकांना संपविण्यासाठी पक्षाबाहेरील लोकांची मदत घेतली जाऊ लागली आहे. एरंडोली केली जात आहे. म्हणून बेरीज वजाबाकीऐवजी एरंडोली या नव्या नावाने हे सदर आता दर सोमवारी भेटीला येईल. त्यात राजकारणातील ‘एरंडोली’चा परामर्ष असेल. पूर्वीच्या एरंडोल तालुक्यातील धरणगावचे साहित्यिक मित्र बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, मिलिंद बागूल यांच्याशी एरंडोली या शब्दाविषयी चर्चा केली. महाभारतापासून तर वर्तमानकाळापर्यंत एरंडोलीचे अनेक संदर्भ त्यांनी दिले. मधला मार्ग काढणे, तडजोड करणे असा याचा साधा सोपा अर्थ आहे. भाजपची जिरवण्यासाठी शिवसेनेने राष्टÑवादी व काँग्रेससोबत जाऊन एरंडोली केली, हा रुढार्थ आहे ‘एरंडोली.’ -मिलिंद कुलकर्णी

‘PA’ name: means kettle hotter than tea | ‘पीए’नामा : अर्थात चहापेक्षा किटली गरम

‘पीए’नामा : अर्थात चहापेक्षा किटली गरम

Next

- मिलिंद कुलकर्णी

भाजपचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून दिवाळीचे फटाके फोडले. त्यांचे समर्थक प्रा.सुनील नेवे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाचे निमित्त लाभले. (लेखक नेवे तेच, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली होती.) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदा त्यांनी नामोल्लेख केला. आतापर्यंत थेट नाव घेत नव्हते. पुढे जाऊन त्यांनी माजी मंत्र्यांच्या पीएची एका महिलेसोबतची अश्लिल छायाचित्रे आणि क्लिपचा मुद्दा चर्चेत आणून बॉम्बगोळा टाकला. त्यांनी कोणत्याही माजी मंत्र्याचे नाव घेतले नाही, किंवा पीएचे देखील घेतलेले नाही. परंतु, त्यांच्या विधानांमधील अर्थ शोधायचा म्हटला, तर तर्क लढविले जातात. पक्षाच्या वरिष्ठांकडे मी हे छायाचित्रे आणि क्लिप दिली आहे हा एक आणि जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना विचारा हा दुसरा उल्लेख संशयकल्लोळ निर्माण करण्यास पुरेसा आहे. खडसे यांनाही नेमके तेच हवे आहे काय, हे कळायला मार्ग नाही. मात्र एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारले आहेत. माजी मंत्री आणि त्याच्या पीएला गॅसवर ठेवले आहे आणि भाजप पक्षश्रेष्ठींना पेचात पकडले आहे.
चहापेक्षा किटली गरम
हे मिश्किल विधान आहे, भाजपचे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. गडकरी हे अनुभवी, परिपक्व नेते आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. रा.स्व.संघाशी जवळीक असलेले नेते आहेत. त्यांनी नेत्यांच्या स्वीय सहाय्यकांविषयी हे विधान केले आहे. आमदार, खासदार, मंत्री यांना जनतेकडे पाच वर्षात एकदा जायचे असते, त्यामुळे ते प्रसंगी नम्रपणे वागतात, बोलतात. जनहितासाठी प्रशासनावर आसूड ओढतात. पण त्यांचे पीए मात्र हवेत असतात. त्यात आता ‘दूतां’ची भर पडली आहे. आपण लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यासोबत राहतो, म्हणजे आपण जगावेगळे. सतत खेकसत राहणे. अधिकाऱ्यांनादेखील मंत्री असल्यासारखे हुकूम सोडणे, असे प्रकार घडतात. नेत्यांचे नुकसान त्यांच्या कार्यपध्दतीपेक्षा त्यांचे पीए अधिक करतात, असे चित्र आहे. जळगावातील एका आमदाराने जवळच्या नातलगाला स्वीय सहाय्यक नेमले. कार्यकाळ संपता संपता त्याला लक्षात आले की, त्यानेच चुना लावला. एका ज्येष्ठ आमदाराचा पीए तर आमदार निधीतील कामात भागीदार बनल्याचे उघडकीस आल्यावर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ‘त्याच्याशी’ संबंध नाही, असे जाहीर केले गेले. लाच मागीतल्याप्रकरणी मुंबईत अटक केलेल्या गजानन पाटील याने खडसेचे पीए असल्याचे भासविले होते. अर्थात चांगल्या स्वीय सहाय्यकांची उदाहरणेदेखील काही कमी नाहीत. मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक होते. अशोक कांडेलकर हे खडसे यांचे स्वीय सहाय्यक होते आणि पुढे त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक असलेले संजय सावकारे पुढे आमदार आणि राज्यमंत्री झाले.
भाजपमधील सुडाचा प्रवास
सत्तेचे अवगुण काँग्रेस पक्षाप्रमाणे भाजपमध्येदेखील आले आहेत. पक्षांतर्गत विरोधकाला संपविण्याचे प्रयत्न बेमालूमपणे होत असतात. त्यासाठी दुसºया पक्षाची मदत घेतली गेल्याची उदाहरणे आहेत. एम.के.अण्णा पाटील व वाय.जी.महाजन या दोन खासदारांना प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात अटक झाली होती. देशातील काही मोजक्या खासदारांविषयी स्टिंग आॅपरेशन केले गेले, त्यात ही दोन नावे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धीने कळविल्याची चर्चा त्या काळात होती. हाच प्रकार २०१९ मध्ये ए.टी.पाटील यांच्याविषयी झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करुन त्यांचे तिकीट कापले गेले. जळगावातील भाजपचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील यांना लाच घेताना अडकविण्यात पक्षातीलच काही नेते सहभागी होते. हा सुडाचा प्रवास एकमेकांची राजकीय कारकिर्द संपविण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपचे मेळावे, बैठका आता हाणामारीने गाजू लागल्या आहेत. अमळनेरातील लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा असो की, जळगावात जिल्हाध्यक्ष निवडीचा मेळावा असो, हाणामारीचे गालबोट लागतेच. पूर्वी काँग्रेसमध्ये जे व्हायचे, ते आता भाजपमध्ये व्हायला लागले. पार्टी विथ द डिफरन्स, साधनशुचिता वगैरे काय असते, त्याच्याशी कुणाला आता देणेघेणे राहिलेले नाही.
खडसे समर्थक राष्टÑवादीच्या वाटेवर
खडसे यांनी आरपारची लढाई सुरु केल्याचे त्यांच्या नव्या पवित्र्यावरुन दिसून येते. पक्षश्रेष्ठींकडे पुरावे देऊन त्यांना त्रास देणाºया पक्षांतर्गत नेत्यांवर कारवाई होत नाही, ही त्यांची व्यथा आहे. पक्षाविरुध्द ते बोलत नाही, पण पक्षात घुसमट होत आहे, हेदेखील स्पष्ट आहे. ते कुठे जातील, याविषयी तर्कवितर्क होत असले तरी त्यांचे समर्थक मात्र राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. अनिल भाईदास पाटील हे त्यांचे समर्थक. तीनदा आमदार झालेल्या डॉ.बी.एस.पाटील यांचे तिकीट कापून अनिल पाटील यांना अमळनेरात भाजपचे तिकीट खडसेमुळेच मिळाले होते. २००९ व २०१४ मध्ये पक्षांतर्गत गटबाजीमुळे पाटील पराभूत झाले. नंतर राष्टÑवादीत गेले आणि २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पालिकेत खडसे यांनी त्यांना बळ दिले. तिकडे धुळ्यात अनिल गोटे हे राष्टÑवादीत गेले. खडसेमुळे २०१४ मध्ये गोटे भाजपचे उमेदवार झाले होते. आणि आता शहाद्याचे उदेसिंग पाडवीदेखील राष्टÑवादीत गेले. खासदार रक्षा खडसे यांचे माहेर असलेल्या मतदारसंघातून खडसेच्या प्रयत्नामुळे पाडवी पहिल्यांदा आमदार झाले. अर्थात खडसे यांचे समर्थक असल्याने त्यांना त्रास झाला, तिकीट कापले गेले हे देखील उघड आहे.
- मिलिंद कुलकर्णी

 

Web Title: ‘PA’ name: means kettle hotter than tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.