ओबीसींच्या मुद्यावर नणंद-भावजयी आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:42+5:302021-06-25T04:13:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : न्यायालयाने ओबींसीचे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या ...

Nand-Bhavjayi face-to-face on OBC issue | ओबीसींच्या मुद्यावर नणंद-भावजयी आमने-सामने

ओबीसींच्या मुद्यावर नणंद-भावजयी आमने-सामने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : न्यायालयाने ओबींसीचे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी व भाजप या मुद्यावर आमने-सामने असताना, जिल्ह्यात खडसे कुटुंबीयांमध्येच गट-तट पडले आहेत. भाजपच्या खासदार रक्षा खडसे व राष्ट्रवादीच्या ॲड.रोहिणी खडसे या आमने-सामने आल्या असून, रोहिणी खडसे यांनी ओबीसीच्या मुद्यावर भाजपवर टीका केल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी देखील भाजपने ओबीसी आरक्षण दिले म्हणूनच आम्ही या पदावर असल्याचे सांगत रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण न्यायालयाने काढून घेतल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने या प्रकरणी न्यायालयात भक्कम बाजू मांडली नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण काढले असल्याचा दावा करत भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या आधीच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या ॲड.रोहिणी खडसे यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही. या शब्दात त्यांनी टीका केली आहे.

तर भाजपने रोहिणी खडसेंना विधानसभेची संधी दिलीच नसती

ओबीसीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य करणारे ट्विट केल्यानंतर, त्यांच्या भावजयी म्हणजेच भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. खडसे गुरुवारी दुपारी भाजपच्या बैठकीसाठी जळगावात आलेल्या होत्या. 'भाजपने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपने विधानसभेची संधी दिली नसती', अशा शब्दांत रक्षा खडसेंनी रोहिणी खडसेंचा मुद्दा खोडून काढला.

रक्षा खडसे बनणार भाजपचा ओबीसी चेहरा?

एकीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे सातत्याने भाजपने ओबीसींचे नेतृत्व संपविले असल्याचा आरोप करत आहेत. आता ॲड.रोहिणी खडसे यांनी देखील भाजपवर ओबीसींच्या मुद्यावर टीका केली आहे. अशा परिस्थितीत भाजपने खासदार रक्षा खडसे यांच्याकडे ओबीसींच्या मुद्यावर होत असलेल्या आंदोलनाची जबाबदारी देवून, खडसे परिवारालाच एकप्रकारे उत्तर देण्याची खेळी खेळली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच आगामी काळात भाजपकडून रक्षा खडसे या भाजपचा ओबीसी चेहरा बनणार असा ही अंदाज आतापासून लावला जात आहे.

Web Title: Nand-Bhavjayi face-to-face on OBC issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.