बेपत्ता मुलींना भेटले ‘सोशल मीडिया’मुळे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:43 PM2020-02-23T22:43:02+5:302020-02-23T22:43:07+5:30

बोदवडच्या वृद्धेने दिला होता आधार : सामाजिक कार्यकर्त्याने बातम्या शोधून मध्यप्रदेशात साधला संपर्क

Missing girls meet parents for 'social media' | बेपत्ता मुलींना भेटले ‘सोशल मीडिया’मुळे पालक

बेपत्ता मुलींना भेटले ‘सोशल मीडिया’मुळे पालक

Next

बोदवड : मध्यप्रदेशातून बेपत्ता झालेल्या १२ आणि चार वर्ष वयाच्या दोन मुलींना बोदवड येथे एका वृद्धेने आसरा दिला. दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने मोठ्या मेहनतीने सोशल मीडियावर मध्यप्रदेशातील हरविल्याच्या बातम्या शोधत तपास लावल्याने या मुलींना त्यांचे पालक मिळाले. सोशल मीडियामुळे या मुलींना आपले पालक मिळाले.
वृत्त असे की, मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा गावातील राणी संजय गजबे (वय १२) आणि काजल प्रकाश कोल्हे (वय चार) या दोन अल्पवयीन मुली १९ फेब्रुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्या होत्या. या मुली तेथून रेल्वे तसेच मिळेल त्या वाहनाने मुक्ताईनगर येथे पोहचल्या. २१ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्या एका रिक्षात बसून नाडगाव पर्यंत आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नसल्याचे लक्षात आल्यावर त्या रिक्षात आलेल्या गोकर्णाबार्ई गंगाराम घुले या वृद्धेस त्यांची दया आली. त्यांनी त्यांना सोबत घेऊन बोदवड पोलीस ठाण्यात येऊन माहिती देत पुढील तपास लागेपर्यंत त्यांना सांभाळण्याची जवाबदारी घेतली. यानंतर त्या काम करत असलेल्या खंडेलवाल जिनिंग येथे घेऊन आल्या. त्यांना अंघोळ घालून चांगले कपडे दिले. बोदवड पोलीस ठाण्याचे हवालदार वसंत निकम, कॉन्स्टेबल मनोहर बनसोडे, मुकेश पाटील यांनी सहकार्य केले. या मुलींचा दोन दिवस सांभाळ करण्यास खंडेलवाल जिनिंगचे संचालक कैलास खंडेलवाल यांनी सहकार्य केले. आपल्या मुलीची भेट होताच मुलीचे वडील प्रकाश कोल्हे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व त्यांनी पाया पडून सर्वांचे आभार मानले.

... आणि असा लागला तपास
या मुलींबाबत रिक्षाचालक मनोहर पाटील यांनी सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांना माहिती दिली. त्यावेळी पाटील यांनी मुलींना खाऊ देत माहिती मिळवली. यानुसार त्यांनी मध्यप्रदेशमध्ये प्रसिध्द होणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर शोधल्या. त्यावेळी या मुली पांढुर्णा येथूनच बेपत्ता झाल्या असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी पांढुर्णा पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक शोधून संपर्क केला. तेथील प्रभारी भूपेंद्र गुलबाके यांना मुलींचे छायाचित्रे व्हॉट्सअपला पाठवले. या मुली त्याच असल्याचे स्पष्ट झाले. गुलबाके यांनी तत्काळ तेथून सहायक उपनिरीक्षक बी.एन.रघुवंशी, कॉन्स्टेबल अनुरोध बघेल, काजलचे वडील प्रकाश कोल्हे व राणीचे परिचित सूरज मडके यांना वाहन घेऊन रवाना केले. या सर्वांनी रविवारी पहाटे चार वाजता येऊन या मुलींना ताब्यात घेतले.

Web Title: Missing girls meet parents for 'social media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.