जीएसटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार परराज्यातून हलवितोय सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:04+5:302021-03-07T04:16:04+5:30

जळगाव : तरुणांच्या नावावर बनावट फर्म तयार करून कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनी व कोट्यवधींचा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांकडून उघड झाल्यानंतर ...

The mastermind behind the GST scam is moving from foreign countries | जीएसटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार परराज्यातून हलवितोय सूत्र

जीएसटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार परराज्यातून हलवितोय सूत्र

Next

जळगाव : तरुणांच्या नावावर बनावट फर्म तयार करून कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनी व कोट्यवधींचा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांकडून उघड झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून जे नाव समोर आले आहे, तो सध्या मध्यप्रदेशातून सूत्र हलवित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जळगावात विविध व्यवसाय करीत असताना फायनान्स कंपनी स्थापन केली व तीदेखील बंद पडल्याने तो मध्यप्रदेशात व्यवसाय करीत आहे. यात दोन दिवसांपूर्वी तो जळगावात येऊन गेल्याचेही सांगितले जात आहे.

पहूर, ता.जामनेर येथील तरुणांच्या कागदपत्रांच्या आधारे बनावट नावाने फर्म स्थापन केल्याचा प्रकार केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत उघडकीस आला. या सर्व प्रकारात मुख्य सूत्रधार म्हणून जे नाव समोर आले आहे, ते जळगावातील आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात या व्यक्तीविषयी माहिती घेतली असता सध्या बांधकाम व्यवसायानिमित्त मध्यप्रदेशात असल्याचे समजले. त्यामुळे हे प्रकरण मुख्य सूत्रधार हा परराज्यातून चालवित होता, असे समोर आले आहे.

हॉटेल, फायनान्स कंपनीनंतर बांधकाम व्यवसाय

मुख्य सूत्रधार हा पूर्वी जळगावात आकाशवाणी चौक ते सिंधी कॉलनीदरम्यान एक हॉटेल चालवित असल्याची माहिती मिळाली. मात्र नंतर ती हॉटेल बंद पडली. त्यामुळे तो बांधकाम व्यवसायाकडे वळला. जळगावात त्याने विविध ठिकाणी जागा घेऊन त्या विकसित केल्या. या दरम्यान त्याने नटवर कॉम्प्लेक्ससमोर फायनान्स कंपनीचे कार्यालय सुरू केले. तेथून ते नंतर सोनार गल्लीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. मात्र तेथेही हे कार्यालय बंद झाले. त्यानंतर हा सूत्रधार मध्यप्रदेशात गेला. तेथेही त्याने बांधकाम व्यवसाय सुरू केला असून नामांकित बांधकाम व्यावसायिक अशी ंख्याती असल्याचे सांगण्यात येत आहे.

कधी जळगावात, कधी मध्यप्रदेशात

मूख्य सूत्रधाराचे कुुटुंब जळगावातच असून मध्यप्रदेशात बांधकाम व्यवसाय असला तरी तेथून तो १० ते १५ दिवसातून जळगावात येत असतो. चार वर्षांपासून मध्यप्रदेशात जाऊन व्यवसाय संभाळत असतानाही जीएसटी घोट्याळ्यातील प्रकरणे घडली. जळगावात त्याच्या भावाचे कापड दुकान असून एक भाऊदेखील व्यवसाय करतो.

दोन दिवसांपूर्वी जळगावात

मुख्य सूत्रधार हा दोन दिवसांपूर्वीच जळगावात होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. त्या वेळी त्याच्या काही जणांशी भेटीगाठीदेखील झाल्या.

माझा काही संबंध नाही....

संबंधित सूत्रधाराशी लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल सतत बंद येत होता. मात्र शनिवारी लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर त्याच्याशी काही जणांनी संपर्क साधून विचारणा केली असता त्याने याच्याशी आपला संबंध नसल्याचे उत्तर दिले. मात्र जळगावातील एक-दोन नव्हे तर अनेक जणांकडून विशेषत: काही निकटवर्तीयांकडूनही हा सूत्रधार व्यक्ती सध्या मध्यप्रदेशात बांधकाम व्यवसाय करीत असल्याचे सांगत या प्रकारातील व्यक्तीच्या नावाला त्यांनी दुजोरादेखील दिला आहे.

Web Title: The mastermind behind the GST scam is moving from foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.