प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:17 IST2025-12-02T13:16:59+5:302025-12-02T13:17:43+5:30
चाळीसगावच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मातृशक्तीला सलाम; स्थानिक आमदाराची भावना

प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
जळगाव: मतदार यादीतील गोंधळ, ऐन मतदानाच्या काही तास आधी काही ठिकाणी पुढे ढकललेली निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. या निवडणुकांची मतमोजणी उद्या लगेच होणार होती. पण आता ही मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. याचदरम्यान जळगाव जिल्ह्यातील एका गरोदर महिला मतदाराने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
प्रसूतीची तारीख असताना मतदान
प्रसूतीची तारीख असताना देखील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील कोमल पाटील यांनी मतदानाला प्राधान्य दिले. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. चाळीसगावच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मातृशक्तीला सलाम असल्याची भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली. प्रसूतीसाठी ऍडमिट होण्याआधी कोमल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावत एकप्रकारे सर्वांना मतदान करण्यास प्रेरित केले.
तब्बल आठ ते १० वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबत कमालाची उत्सुकता आणि उत्साह आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिट वापरली जात आहेत.