मौजमजेसाठी केली १५ लाखांची लुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:38+5:302021-03-06T04:16:38+5:30

जळगाव : पिस्तुलचा धाक दाखवून पंधरा लाखाची लूट करणा-या मनोज उर्फ खुशाल अशोक मोकळ (२२, मोहाडी, ता.जि.धुळे) व रितीक ...

Looted Rs 15 lakh for fun | मौजमजेसाठी केली १५ लाखांची लुट

मौजमजेसाठी केली १५ लाखांची लुट

Next

जळगाव : पिस्तुलचा धाक दाखवून पंधरा लाखाची लूट करणा-या मनोज उर्फ खुशाल अशोक मोकळ (२२, मोहाडी, ता.जि.धुळे) व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१९, रा.पवननगर, धुळे) या दोघांच्या एलसीबीने उल्हासनगर येथून मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून नऊ लाख १० हजार रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज मोकळ हा सराईत गुन्हेगार असून मौजमजेसाठी लुट करतो व त्याच्यावर नाशिकसह धुळ्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली़

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महेश मोहनचंद्र भावसार व संजय सुधाकर विभांडीक या दोघांना पिस्तुलचा धाक दाखवून १५ लाख रूपयांची रोकड लुटल्याची घटना १ मार्च रोजी भरदिवसा सायंकाळी ५.२० वाजता पंचममुखी हनुमान मंदिराजवळ घडली होती.

स्वतंत्र कंट्रोल रूम

लुट करणा-यांच्या शोधार्थ पोलीस अधीक्षकांच्या मागदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस व एलसीबीचे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले होते. या पथकांना तांत्रिक माहिती देण्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम सुध्दा स्थापन केले गेले होते. या कंट्रोल रूममधून पोलीस कर्मचारी विजय पाटील व नरेंद्र वारूळे यांच्याकडून माहिती पुरविली जात होते.

पोलीस मागावर कळताच, सुरतला झाला फरार

भावसार व विभांडीक यांच्याकडून पंधरा लाखाची रक्कम चोरल्यानंतर मनोज हा बसने सापुता-याला तर रितीक हा धुळ्याला फरार झाला. पण, पोलीस धुळ्याला आपला शोध घेत असल्याचे कळताच, त्याने सुरतला धाव घेतली़ त्यानंतर मनोज याने रितीक याला संपर्क साधून सापुता-याला त्यास घेण्यासाठी बोलवून घेतले. रितीक हा भाड्याने वाहन करून सापुता-याला गेला. त्यानंतर ते दोघे सुरतला आले. मात्र, सुरत चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पैसे दिसून आल्यानंतर त्याबाबत विचारणा सुध्दा केली. मात्र, घरबांधकामाचे पैसे असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना तेथून जाऊ देण्यात आले असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आले आहे.

रितीक आहे मल्लं

पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित रितीक राजपुत हा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मल्लं असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. परंतु, त्याच्यावर सुध्दा एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. मनोज मोकळ याच्यावरही नाशिक व धुळे येथे सात गुन्हे दाखल आहेत. तर धुळ्यात देखील लुटीचे गुन्हे दाखल असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल सुध्दा पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कारवाई एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, संतोष मायकल, भारत पाटील यांनी केली आहे. लुटीतील संशयितांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Looted Rs 15 lakh for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.