लॉकडाऊनमुळे योग दिन झाला आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:03 PM2020-06-22T12:03:01+5:302020-06-22T12:03:08+5:30

जळगाव : कोरोनानिमित्त लॉकडाऊन असल्याने रविवारी अनेकांनी घरात योग करूनच योग दिन साजरा केला. तसेच सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे ...

Lockdown makes Yoga Day online | लॉकडाऊनमुळे योग दिन झाला आॅनलाईन

लॉकडाऊनमुळे योग दिन झाला आॅनलाईन

Next

जळगाव : कोरोनानिमित्त लॉकडाऊन असल्याने रविवारी अनेकांनी घरात योग करूनच योग दिन साजरा केला. तसेच सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे आॅनलाईन पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे शहरातील योग शिक्षकांनी अ‍ॅपद्वारे विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखवित योगाचे महत्व सांगितले. याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

पोदार इंटरनॅशनल स्कूल
पोदार इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणातून युट्युब लिंक व झुम अ‍ॅपद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सतिश कुलकर्णी व स्कुलचे प्राचार्य गोकुळ महाजन उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वरिष्ठ समन्वयक दीपक भावसार, आय. टी. इंजिनिअर महेश खलाणे, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन उपप्राचार्य रूपेश घाटगे यांनी केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
क्रीडा युवा संचालनालयाअंतर्गंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आॅनलाईन पद्धतीने योगदिन साजरा करण्यात आला. आॅनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व सांगितले. तसेच जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित व योगशिक्षिका डॉ. अनिता पाटील यांनीदेखील योगदिनाचे महत्व अधोरेखित केले. यशस्वीतेसाठी के. के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या वैशाली पंडित, विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य हॅरी जॉर्ज जॉन, प्रशासन अधिकारी कामिनी भट आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय पंच रूद्राणी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतना देवरे, नंदिनी दुसाने यांनी विविध योग प्रात्याक्षिके करून दाखविले.

विद्यापीठात आॅनलाईन योग कार्यशाळा
उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुणे व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘महामारीच्या काळात योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व’ या विषयावर आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कार्यशाळा पार पडली. यात भारतातील १ हजार ४४४ जणांनी सहभाग नोंदविला. उद्घाटन कोस्टारिकाचे भारतातील दूत मारीयला क्रुज यांची चित्रफित दाखवून करण्यात आले. प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे उपस्थित होते. डॉ. मनमत घरोटे, थायलंड येथील प्रा. धीराविट, भुवनेश्वर येथील प्रा. डॉ. सच्चिदानंद बेहेरा यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी, आभार डॉ. प्रवीण महाले यांनी मानले.

जिल्हा रुग्णालय
आयुष विभाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जळगाव येथे योग सप्ताह आणि योग दिन आॅनलाइन पद्धतीने सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनोहर बावने, सहाय्यक जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. माधुरी नेहते यांच्या उपस्थितीत योग दिन झाला. सदृढ आरोग्यासाठी योग, मानसिक तणाव आणि योग, बौद्धिक विकास आणि योग या विषयावर अनंत महाजन व प्रा.सोनल महाजन यांनी मार्गदर्शन केले.

रेल्वेतर्फे योग दिनाचे आयोजन
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी रविवारी सकाळी अ‍ॅपद्वारे योग सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांच्यासह रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. आॅनलाईन योग सत्रा मध्ये योग साधनेचे प्रात्यक्षिक योग शिक्षक एन . पी. परदेशी यांनी सादर केले. सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी आणि ग्रंथपाल संतोष उपाध्याय यांनी केले. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्कूलच्या उपप्राचार्य स्वाती चतुर्वेदी, कला शिक्षक आर. पी. जावळे, देवेंद्र विश्वकर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. आभार एन. डी. गांगुर्डे यांनी मानले.

कोरोना रुग्णांना महापौरांनी दिले योगाचे धडे
कोरोनाशी लढा देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी महापौर भारती सोनवणे दररोज कोरोनाग्रस्तांना योगाचे धडे देत आहेत. रविवारीही जागतिक योग दिवस महापौरांनी कोरोनाग्रस्तांना योगाचे धडे देत साजरा केला. यावेळी योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे यांनीही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांना योगाचे महत्व पटवून दिले. मनपाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि संशयित व्यक्तींची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. रुग्णांसाठी महापौर भारती सोनवणे व योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे या सकाळीच रविवारी सकाळी ६.३० वाजता कोविड केअर सेंटरला पोहचल्या. त्याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना इमारतीच्या गॅलरीत तसेच विलगीकरण केलेल्या व्यक्तींना खोलीच्या खिडकीत उभे राहून योग करून घेतला.

मानव सेवा मंडळ शाळा
मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातर्फे योगा दिन शाळेऐवजी घरीच साजरा करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांनी घरी योगासने केली. योग शिक्षक मनोज बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ च्या माध्यमातून पूरक व्यायाम व आसने याविषयी मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य मिळाले.

इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमध्ये े ‘ पोस्ट कोविड युगातील ताण तणाव व्यवस्थापन आणि एक आरोग्यसंपन्न जिवन पध्दती ‘ या विषयावर वेब फॅकल्टी डेव्हलपमेंट वेबीनार झाले. संचालिका प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आॅनलाईन योग सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यात योगतज्ज्ञ स्वप्नील काटे यांनी मार्गदर्शन केले. यापुढे महाविद्यालय सुरु झाल्यावरही आपल्याला प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघांसाठी योगाचा आर्धा तास ठेवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलुन दाखवला. यासाठी तंत्रसाहाय्य प्रा. तनुजा फेगडे, प्रा. राकेश राणे, प्रा.पराग नारखेडे यांनी केले.

Web Title: Lockdown makes Yoga Day online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.