मतदार संघाबाहेर गेलेले नेते, कार्यकर्त्यांना परतावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:34 AM2019-10-20T11:34:45+5:302019-10-20T11:35:29+5:30

प्रशासनाकडून होणार हॉटेल्स, लॉज, पक्ष कार्यालयांची तपासणी, कार्यकर्त्याची धावपळ

Leaders, workers who are outside the constituency will have to return | मतदार संघाबाहेर गेलेले नेते, कार्यकर्त्यांना परतावे लागणार

मतदार संघाबाहेर गेलेले नेते, कार्यकर्त्यांना परतावे लागणार

Next

जळगाव : मतदारसंघाबाहेर प्रचारासाठी फिरत असलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आता आपल्या मूळ ठिकाणी परतावे लागणार आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपल्यानंतर त्या मतदार संघाचा मतदार नसलेल्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांना त्या मतदार संघात थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत पथकांची नियुक्ती करून पक्ष कार्यालये, हॉटेल्स, लॉजची तपासणी करून खात्री करून घेतली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा २१ सप्टेंबर रोजी झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिताही लागू झाली. तर २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. ७ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला. प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा कालावधीच उमेदवारांना मिळाला. त्यामुळे नेते मंडळी, तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार करण्याची व प्रचाराची व्यूहरचना आखण्याची धावपळ करावी लागली.
तक्रार आल्यास घेतली जाणार दखल
शनिवार, १९ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपली. ही मुदत संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांना ते मतदार नसलेल्या मतदार संघात थांबता येणार नाही, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने विशेष पथकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मतदारसंघाबाहेरील कुणी नेता, कार्यकर्ता थांबलेला असल्याची तक्रार आली तर त्याची दखल घेतली जाणार असल्याची माहितीही निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Leaders, workers who are outside the constituency will have to return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव