भगिनींनो, सक्षम होऊ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:44 PM2019-12-31T22:44:40+5:302019-12-31T22:44:54+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांच्या संदर्भात चाळीसगाव येथील वकील तथा साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी घेतलेला आढावा.

Ladies, let's be able | भगिनींनो, सक्षम होऊ या

भगिनींनो, सक्षम होऊ या

Next

काही कटू, तर काही सुखद घटनांचा लेखाजोखा देत २०१९ हे वर्ष पाठमोरं होत आहे. ‘निरोप मावळत्याला, स्वागत उगवत्याचे’ या न्यायाने आपण नववर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. प्रत्येक सरणारी घटिका ही तथाकथित सुखद, दु:खद किंवा संमिश्र भावनांचे पडसाद आणि काही आव्हानांची नांदी मागे ठेवून जात असते. त्या अनुषंगाने प्रत्येकानेच स्वत:ला अधिक सक्षम आणि प्रबळ बनविण्याची गरज असते.
महिलांच्या दृष्टिकोनातून २०१९ ह्या कालखंडाचा मागोवा घेताना काही घटना ह्या निश्चितच समस्त महिलावर्गाच्या मनोबलाचं खच्चीकरण करणाऱ्या घडल्या आहेत.
जी भारतीय स्त्री लोकसंख्येचा ५० टक्के भाग व्यापून आहे, अर्ध आकाश जिचं आहे आणि जी स्त्री सर्वच क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेण्यास सर्वार्थाने सज्ज आहे तीच स्त्री जेव्हा सामूहिक झुंडशाही, पाशवी बलात्कार आणि हत्या, अ‍ॅसिड हल्ले, आॅनर किलिंग, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी यासारख्या घटनांना बळी पडते तेव्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ज्वलंत सामाजिक प्रश्न बनून ऐरणीवर येतो. व्यक्ती म्हणून निकोपपणे जगणही हिरावून घेत मानवतेला काळिमा फासणाºया अलिकडल्या काळातील उन्नाव व हैदराबादच्या पाशवी बलात्कार व हत्येच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून टाकला आहे.
हा क्षोभ, ही वेदना क्षणिक ठरू नये. समष्टीचं जगणं आणि भोगणं जेव्हा सर्वव्यापी होईल तेव्हाच अत्याचार पीडिता ही कुणा दुसºयाची मुलगी ही भावनाच संपून जाईल. त्या दुखाची तीव्रता ही समस्त स्त्री वर्गाची व्याप्ती होईल. आणी स्त्री वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने संघटित होऊन लढा उभारेल तेव्हाच कायद्याला ढील देणाºया सरकारलादेखील पळता भुई थोडी होईल. २०१२ मधे घडलेल्या दिल्लीतील निर्भया बलात्कार पीडितेला अजून न्याय मिळालेला नाही. आरोप सिद्ध होऊनही सात वर्षांनंतरही आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही हे समाजस्वास्थाला हितकारक नाही. असे असताना कठोर कायद्याचा अभाव व न्यायप्रकियेला विलंब ही कारणं खचितच समर्थनिय नाहीत. आपल्याला लोकशाहीने जनआंदोलन, मोर्चे ही प्रभावी आयुधं दिलेली आहेत. जनक्षोभाचा परिपाक आपण हैदराबादमध्ये बघितला आहे. आंध्र सरकारने बलात्कारप्रकरणी पंधरा दिवसात न्यायालयीन निवाडा व्हावा, हा कायदा संमत केला आहे. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या दिशेने पाऊल उचलण्यासाठी सकारात्मक आहेत. राजकीय इच्छाशक्ती दबाव तंत्रापुढे झुकते हे सत्य आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे. म्हणून महिलांनी संघटित होऊन प्रबळ असा दबाव गट निर्माण करून समर्थपणे चळवळी उभारणे ही काळाची गरज आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो धजेल तयाचे’ हा बोधमंत्र घेऊन अधिक आत्मनिर्भय होऊया. नववर्षात अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी मजबूतपणे संघटित होऊ या.
-अ‍ॅड.सुषमा जयंत पाटील, चाळीसगाव, जि.जळगाव

Web Title: Ladies, let's be able

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.