पत्नीच्या विरहात लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला खानापूरच्या युवकाची अहमदाबादला आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:20 PM2020-07-08T21:20:26+5:302020-07-08T21:22:22+5:30

अर्धांगिनीच्या विरहातून आलेल्या नैराश्यात खानापूर येथील युवकाने विवाहाच्या चौथ्या वाढदिवसाला घरी आत्महत्या केली.

Khanapur youth commits suicide in Ahmedabad on his fourth wedding anniversary | पत्नीच्या विरहात लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला खानापूरच्या युवकाची अहमदाबादला आत्महत्या

पत्नीच्या विरहात लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला खानापूरच्या युवकाची अहमदाबादला आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वी पत्नी सुवर्णाचा झाला होता अकस्मात मृत्यू१५ दिवसांपूर्वीच गाठले होते अहमदाबादअडीच वर्षांची चिमुकली परी झाली आईबापाअभावी पराधीन

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : पत्नी सुवर्णाच्या मृत्यूला चार महिने लोटत नाही, तोच अर्धांगिनीच्या विरहातून आलेल्या नैराश्यात खानापूर येथील ३० वर्षीय रवींद्र खेमचंद्र महाजन या इलेक्ट्रिशियन असलेल्या युवकाने मंगळवारी विवाहाच्या चौथ्या वाढदिवसाला अहमदाबाद येथील विजेलपूर भागातील राहत्या घरी पंख्याला पत्नीच्या ओढणीच्या साह्यानेचं गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जन्मदात्या मातेच्या मृत्यू पाठोपाठ पित्यानेही आत्महत्या केल्याने त्यांची अडीच वर्षांची कन्या चिमुकली प्राची उर्फ परी ही पराधीन झाली आहे.
रावेर तालुक्यातील खानापूर येथील रवींद्र खेमचंद्र महाजन याचा विवाह रावेर येथीलच संतोष रघुनाथ महाजन यांची कन्या सुवर्णा हिच्याशी ७ जुलै २०१६ रोजी रावेर येथे झाला होता. दरम्यान, रवींद्रने इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याने, त्याने त्याचा थोरला भाऊ राजेंद्र महाजन, मोठे वडील वामन महाजन, श्रीकृष्ण महाजन व मामा यांचा आधार घेत विवाहानंतर अहमदाबादला स्थलांतर केले. वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्याने आई वत्सलाबाई खानापूरला शेती हंगाम आटोपून अहमदाबादला जावून राहत असत.
दोघांच्या सुखी संसाराच्या वेलीवर चिमुकली प्राची ही कळी फुलली. रवींद्र व सुनर्णा दोघही मामा मामींसोबत सहलीवरून रात्री आले होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुवर्णा ही घरात झाडलोट करीत असताना अचानक चक्कर येऊन टाईल्सवर कोसळून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता.
जीवनसंंगिणी काळाच्या पडद्याआड गेल्याने रवींद्र हा आपल्या सुखी संसाराचा गाडा कोलमडला म्हणून खानापूरला पत्नी सुवर्णाच्या विरहातील नैराश्यातच जीवन जगत होता. या दरम्यान त्याने गत काळातील काही उरलेल्या औषधीच्या एकत्र गोळ्या घेवून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन पाटील यांनी तातडीने औषधोपचार करून त्याचे प्राण वाचले होते.
तद्नंतर, रवींद्रने मात्र संसारात आलेले नैराश्य व लॉकडाऊनच्या गर्तेतून बाहेर पडत अहमदाबादला गेला. रुममध्ये अस्ताव्यस्त सामान व्यवस्थित करून व दुचाकीची व्यवस्था लावून परत येत असल्याचे सांगून २० जून रोजी अहमदाबादला प्रयाण केले होते. त्या दिवसापासून तो आपल्या दोन्ही मामांकडे वास्तव्यास होता. मंगळवारी दुपारी थोरल्या मामाकडून वेजलपूर येथील आपल्या रूमवर आल्यानंतर त्याने दुपारी अडीचला खानापूरला आईशी, रावेरला मुलगी परीशी बोलण्यासाठी शालकाशी व सासऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. मात्र त्याने विवाहाच्या ७ जुलैच्या चौथ्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंख्याला मयत पत्नीच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्याच्या मामांचा मुलगा कपील हा त्याला बोलावण्यासाठी आला असता दरवाजा आतून लावला असल्याने तो झोपल्याचे गृहीत धरून कपील माघारी परतला. त्यानंतर रात्री जेवणासाठी मोबाईलवर कॉल करूनही तो स्वीकारत नसल्याने व दरवाजा ठोठावूनही तो उठत नसल्याचे पाहून कपीलने दरवाजावर चढून झरोक्यातून पाहिले असता पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
शेजाऱ्यांनी धाव घेवून आनंदनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह उतरवून त्याच्या खिशात असलेली मृत्यूपूर्व जबाब असलेली दीड पानाची सुसाईड नोटची चिठ्ठी जप्त केली आहे. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिवावर अहमदाबाद येथील वैजलपूरच्या वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमरेच्या फ्रॅक्चरने अंथरूणाशी खिळलीय रवींद्रची जन्मदात्री
रवींद्रच्या पत्नीच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याची आई वत्सलाबाई ही शिडीवरून धाब्यावर चढत असताना ऐन शेवटच्या पायरीवरून जमिनीवर आदळल्याने तिच्या कमरेला गंभीर दुखापत होऊन अंथरूणाशी खिळली आहे. सुनेच्या अकस्मात मृत्यूने मुलाचा कोवळा संसार उघड्यावर पडल्याचे दु:ख झेलत असतानाच मुलानेही आपली जीवनयात्रा संपवल्याने अंथरूणाशी खिळून असलेल्या त्याच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. किंबहुना, मुलाच्या अंत्यदर्शनासाठी थेट अहमदाबादला जाणे दुरापास्त ठरल्याने थेट व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर जन्मदात्या आईने अंत्यदर्शन घेतले.

Web Title: Khanapur youth commits suicide in Ahmedabad on his fourth wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.