कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार : स्वस्त धान्य दुकानावरही ‘सोशल डिस्टंसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:48 PM2020-04-02T21:48:51+5:302020-04-02T21:51:37+5:30

सुरेखा महाले यांचा अभिनव उपक्रम

Initiatives to prevent Corona outbreak: 'social distancing' at affordable grain stores | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार : स्वस्त धान्य दुकानावरही ‘सोशल डिस्टंसिंग’

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार : स्वस्त धान्य दुकानावरही ‘सोशल डिस्टंसिंग’

googlenewsNext

जळगाव / पाचोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात केल्या जात असून यात जिल्हा प्रशासनाच्यावतीनही जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करण्यासाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंसिंग’चा अभिनव उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.
सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे स्वत:चे आधार प्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी लावण्यास सांगितले जाते. लाभार्थींनी पाईपच्या दुसºया टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य टाकतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे ‘सोशल डिस्टंसिंग’ होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फूट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही महाले सर्वांना देत आहे. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतूक करण्यात येत आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच नागरिकांनी या कालावधीत सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्याही सूचना दिलेल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या. त्यानुसार ‘मीच माझा रक्षक’ माणून सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटुंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.
या उपक्रमाविषयी महाले यांनी सांगितले की, प्रशासनाच्या आवाहनानुसार ‘मीच माझा रक्षक’ माणून लाभार्थ्यांना अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टँड यासाठी एकूण १६४५ रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांच्याकडे एकूण ४७० लाभार्थी असून हे लाभार्थी सुद्धा माझ्याच कुटुंबाचे घटक आहे. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही महाले यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून जिल्हा प्रशासनातर्फेही जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीचाच एक म्हणजे पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा महाले यांनी अनोखा उपक्रम राबविला असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सांगितले.
दुकानदारांनी मास्कचा वापर करावा
जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत एप्रिल २०२० चे धान्य वाटप सुरू झाले असून जिल्ह्यातील सर्व १९३४ स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. धान्य वाटप करताना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, लाभार्थ्यांमध्ये किमान ३ फुटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी वाटप करताना मास्कचा वापर करावा, तसेच धान्य वाटप करताना वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत इत्यादी सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

Web Title: Initiatives to prevent Corona outbreak: 'social distancing' at affordable grain stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव