If BJP does not give justice to Khadse, the Bhorgaon Leva Panchayat will go against it | खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास भोरगाव लेवा पंचायत विरोधात जाणार

खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास भोरगाव लेवा पंचायत विरोधात जाणार

ठळक मुद्देपहिल्या यादीत नाव न घेतल्याने निषेधसमाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम होतोराज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर परिणाम होणारलेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला४० वर्षांपासून खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत

भुसावळ, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान असून, खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. याचा परिणाम राज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्वाचा निषेध केला आहे.
येथील जामनेर रोडवरील सोनीच्छा वाडीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत कुटुंबनायक रमेश पाटील बोलत होते. यावेळी भोर पंचायतचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे (यावल), बाळू पाटील, भुसावळ येथील लेवा समाज युवक महासंघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.
भाजपची पहिली यादी १ रोजी प्रसिद्ध झाली. ही यादी पाहून समाजाला मोठे दु:ख झाले. पहिल्या यादीत खडसे हे डावलले गेले तो समाजाचा अपमान आहे. त्यामुळे निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही काही सदस्यांनी सांगितले. लेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. ४० वर्षांपासून माजी मंत्री खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. भाजपचा झेंडा हाती घेण्यास कोणी तयार नव्हते, त्या वेळेपासून ते प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांचं नाव सन्मानपूर्वक पहिल्या यादीत घेणे गरजेचे असल्याचेही मत कुटुंबनायक पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या तीन वर्षांपासून भाजप खडसे यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी खडसे यांना माहिती दिली असल्याचे कुटुंबनायक पाटील यांनी सांगितले, तर समाज हा माजी मंत्री खडसे यांच्यासोबत असून, भाजपने खडसे यांची दखल न घेतल्यास भोरगाव पंचायतीचे २१ सदस्य व आठ निमंत्रित सदस्य यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील सहा, त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, अमरावती, मलकापूर, कोथरूड आदी ३५ मतदारसंघांवर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: If BJP does not give justice to Khadse, the Bhorgaon Leva Panchayat will go against it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.