Honey trap case against three including aunt | हनी ट्रॅप प्रकरणात आंटीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हनी ट्रॅप प्रकरणात आंटीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी षडयंत्र रचणा-या आंटीसह, मनोज वाणी व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पाटील यांनीच फिर्याद दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात दिवसभर काथ्याकूट सरु होता, शेवटी रात्री ९.३० वाजेचा मुहूर्त गवसला.

काय आहे अभिषेक यांची फिर्याद
अभिषेक पाटील यांच्या रिंग रोड वरील कार्यालयात १६ रोजी सकाळी ११.३० वाजता एक महिला आली. तेव्हा अभिषेक पाटील व प्रशांत राजपूत असे दोघे होते. मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे, असे सांगितले असता पाटील यांनी राजपूत यांना दरवाजाजवळ पाठविले. त्यावेळी ही महिला म्हणाली, तुम्ही खूप छान राजकीय काम करत आहात, तरी मी कुठल्याही पद्धतीने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करु इच्छित नाही, त्यावेळी पाटील यांनी विचारले की, तुम्ही काय काम करतात, त्यावर या महिलेने सांगितले की, मी मोठ्या लोकांना शारीरिक संबंधासाठी मुली पुरविण्याचे काम करते. तुमच्याकडे पण मला मनोज वाणी नामक व्यक्तीने काही ॲडव्हान्स पैसे देऊन एका मुलीमार्फत तुमचे अश्लील फोटो व व्हीडिओ बनवून पाहिजे किंवा तसे न झाल्यास एखाद्या मुलीमार्फत बलात्कार किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन जेणेकरून अभिषेक पाटील यांचे राजकीय जीवन संपवून जाईल असे सांगितले. यावेळी महिलेच्या मोबाईलमध्ये मनोज वाणी याने पाठविलेला अभिषेक यांचा फोटो व मोबाईल क्रमांक होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे मनोज वाणी, ती महिला व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांसह यांना मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

असे आहेत कलम व व्याख्या

कलम      व्याख्या
१२० ब : अपराधिक षडयंत्र
२९४ : अश्लील कृती व गाणी
४१७ : ठकवणूक करणे

Web Title: Honey trap case against three including aunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.