भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:36 PM2020-08-02T12:36:43+5:302020-08-02T12:38:16+5:30

मिलिंद कुलकर्णी वर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व ...

Betrayal of Jalgaonkars by BJP | भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

Next
लिंद कुलकर्णीवर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व नसल्याने जळगावची स्थिती भकास जळगाव पालिकेतील सुरेशदादा जैन यांची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संपूर्ण बहुमत मिळवत दोन वर्षांपूर्वी सतरा मजली इमारतीवर झेंडा फडकवला. हे मोठे यश मानले जाते. १७ वर्षांपूर्वी भाजपच्याच एकनाथराव खडसे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत डॉ.के.डी.पाटील यांना निवडून आणले होते. तोदेखील एक इतिहास आहे. पण नगराध्यक्ष भाजपचा आणि सभागृहात बहुमत सुरेशदादा जैन यांचे असे त्रांगडे त्यावेळी होते. म्हणून २०१८ मधील विजय हे संपूर्ण यश होते. संकटमोचक म्हणून नवीन ओळख लाभलेल्या गिरीश महाजन यांचा करिष्मा जळगावात चालला. सुरेशदादा जैन यांच्या आघाडीतील महापौर ललित कोल्हे, सदाशिराव ढेकळे यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक भाजपने ओढून घेतले. केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ मिळवायचा असेल तर जळगाव विधानसभा मतदारसंघ नको, तर महापालिका पण द्या, असे आवाहन महाजन यांनी केले . एक वर्षात विकास करुन दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, या महाजन यांच्या प्रतिज्ञेवर जळगावकरांनी विश्वास ठेवला. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाल्या. आमदार आणि महापौर एकाच कुटुंबातील असल्याने जळगावचा विकास वर्षभरात होईल, असे जळगावकरांना निश्चितच वाटले. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यापूर्वी दिलेल्या २५ कोटींचा निधी पडून होता. वर्ष भरात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु झाले, समांतर रस्त्याविषयी मार्ग निघेल, असे चित्र निर्माण झाले, महापालिकेवरील कर्जाचा प्रश्न सोडविण्यात आला. चांगली सुरुवात आहे. महाजन म्हणाले, तरी वर्षभरात विकास होणे शक्य नाही, हे जळगावकरांनी ताडले आणि सुरेश भोळे यांना पुन्हा निवडून दिले. पण आक्रीत घडले. केंद्रात सत्ता, जळगावात सत्ता, पण राज्यातील सत्ता गेली. आता विकास कामे का झाली नाही, हे सांगायला भाजपला कारण मिळाले. राज्यात आमची सत्ता नाही. जसे गेल्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचा होता, पण बहुमत नव्हते, म्हणून १६ महिन्यात काही झाले नाही, असा युक्तीवाद भाजपचे नेते अजूनही करतात. परंतु, केंद्र सरकारशी निगडीत अनेक कामेसुध्दा भाजपचे खासदार, आमदार व महापौर आणि पदाधिकारी या वर्षभरात करु शकलेले नाही, हे सत्य आहे. भोईटेनगर, असोदा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाविषयी काहीही हालचाल नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी १८ हजार घरकुले बांधण्याच्या आश्वासनाचा तर विसर पडलेला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेने स्वत:च्या अधिकारात करण्याची कामे सुध्दा या दोन वर्षांत झालेली नाही. गाळेप्रश्न रखडलेला आहे. गाळ्यांची मुदत वाढवून करार करु, कायदा करु, असे निवडणुकीतील आश्वासन कधीच हवेत विरले. शहर बससेवा, महापालिकेच्या अत्याधुनिक शाळा, घनकचरा प्रकल्प ही कामे सुध्दा झालेली नाही. व्हीजन, प्लान, अ‍ॅक्शन, इम्प्लीमेंट, पॉवर ही पंचसुत्री वापरुन जळगावचा विकास करण्याचे आश्वासन देणाºया भाजपने दोन वर्षात काय केले हे जळगावकर अनुभवत आहे. रस्त्यातील खड्डे, पहाटे ४ वाजता येणारे पाणी, कचºयाचे ढिग अशा समस्यांची उजळणी करण्याची गरज नाही. महाजन हे निवडणूक जिंकून देऊ शकतात, पण विकास करु शकत नाही, हे मात्र जळगावकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कणखर, विकासाभिमुख व दमदार नेतृत्वाच्या प्रतिक्षेत जळगाव आता आहे. दिल्ली, मुंबईत सत्ता आहे, मात्र जळगाव महापालिकेत सत्ता नसल्याने ४३१ कोटी रुपयांचा निधी देऊनही शहराचा विकास होऊ शकला नाही; सत्ता द्या, एक वर्षात विकास करुन दाखवू. अन्यथा विधानसभेत मते मागायला येणार नाही.गिरीश महाजन यांचे दोन वर्षांपूर्वीचे हे वक्तव्य. संपूर्ण बहुमतासह भाजपला सत्ता देऊनदेखील गाळेप्रश्न, बससेवा, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीयोजना, रस्तेविकास, एमआयडीसीचा विस्तार हे प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. वर्षभरात विकास न होताही जळगावकरांनी भाजपच्या आमदाराला पुन्हा निवडून दिले. पण भाजपने विश्वासघाताशिवाय काय केले?

Web Title: Betrayal of Jalgaonkars by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव