जिल्ह्यात ६०० आॅक्सिजन बेड १५ दिवसात कार्यान्वित - जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:55 PM2020-07-03T12:55:59+5:302020-07-03T12:56:54+5:30

जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रणासाठी उपाययोजना

600 oxygen beds operational in 15 days in the district - Collector Abhijit Raut | जिल्ह्यात ६०० आॅक्सिजन बेड १५ दिवसात कार्यान्वित - जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

जिल्ह्यात ६०० आॅक्सिजन बेड १५ दिवसात कार्यान्वित - जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

Next

जळगाव : दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना स्थानिक पातळीवरच आॅक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५० प्रमाणे एकूण १२०० आॅक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत असून ते येत्या १५ दिवसात उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. यात चोपडा येथील रुग्णालयातील काम जवळपास पूर्ण झाले असून इतर ठिकाणच्या कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे, असेही  त्यांनी सांगितले. 
जिल्ह्यात कोरोनाला आळा बसण्यासाठी तपासण्या वाढविण्यात आल्या असून त्यामुळे रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. यात जिल्हा पातळीवरील जळगावपेक्षा इतर तालुक्यातही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांसाठी या पूर्वीच स्थानिक पातळीवर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सोबतच आता १२ ठिकाणी प्रत्येक ५० अशा एकूण ६०० आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या कामामध्ये पाईपलाईन आॅक्सिजनची व्यवस्था करण्यात येत असून हे ६०० आॅक्सिजन बेड येत्या १५ दिवसात रुग्णांसाठी उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. 
कोविड रुग्णालयातील ताण कमी होऊन सर्वांना उपचार मिळणार
जिल्ह्यात तालुका पातळीवरच आॅक्सिजनची व्यवस्था झाल्यास जळगाव येथील कोरोना रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ताण कमी होऊन रुग्णसंख्या वाढली तरी सर्वांना आॅक्सिजनची उपलब्धता होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील या १२०० आॅक्सिजन बेडसह जळगावातील कोरोना रुग्णालयातील ३०० आॅक्सिजन बेड व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायातील ४०० आॅक्सिजन बेड उपलब्ध होऊन रुग्णांची सोय होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 
शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयातही ‘नॉन कोविड’साठी उपचार
कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३३ खाजगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात प्रसूतीसाठी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात प्रसूतीची व्यवस्था करण्यासह शिरसोली रस्त्यावरील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयातही इतर आजारांच्या रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. 
गणपती रुग्णालयाच्या तक्रारी पाहता तेथील रुग्ण कमी करणार
कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आलेले गणपती हॉस्पिटलमधील तक्रारी पाहता त्या ठिकाणी रुग्ण कमी करण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यासाठीच कोरोना रुग्णालयात आॅक्सिजनच्या व्यवस्थेसह तालुका पातळीवरही आॅक्सिजन बेड वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुळात गणपती हॉस्पिटलची व्यवस्था पाहता ते कोरोनासाठी योग्य ठरू शकणार नाही, असा विचारही पुढे आला आहे. 
संस्था, स्वयंसेवकांची मदत घेणार
सर्वेक्षण करताना मनपा कर्मचाºयांकडून केवळ विचारणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात ताप मोजला जात नाही की इतर लक्षणे पाहिले जात नाही. त्यामुळे सर्वेक्षण करणाºया पथकाने हे काळजीपूर्वक करण्याविषयी जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्या आहेत. यामध्ये रुग्णांची माहिती होण्यासाठी स्थानिक संस्था व स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. 
लक्षणे बदलाहेत, जनजागृती आवश्यक
कोरोना आजाराचे लक्षणे बदलत असून आता अंगदुखी, डायरिया, भूक न लागणे अशा लक्षणांच्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी तपासणीसाठी पुढे येणे व काळजी घेण्यासाठी या विषयी जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. 
‘आयएमए’ डॉक्टरांची यादी ‘फायनल’
आयएमएच्या डॉक्टरांच्या सेवेबाबत संघटनेकडूनच स्पष्टता होत नसल्याने दोन वेळा यादी देऊनही त्यावर निर्णय झाला नव्हता. आता पुन्हा गुरुवारी जिल्हाधिकारी राऊत यांच्यासोबत आयएमएची बैठक झाली व संघटनेने अंतिम यादी दिली असून येत्या दोन दिवसात या डॉक्टरांच्या ड्युटी लागतील, अशी माहिती देण्यात आली. 
दुकानांच्या वेळांबाबत कडक अंमलबजावणी
सध्या जळगाव शहरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येऊन सर्व बंद राहणार असल्याची चर्चा होत आहे. या बाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व व्यवहार बंद केल्यास व्यावसायिकांची आर्थिक घडीही विस्कटेल. त्यामुळे पूर्णपणे बंद न करता दुकानांच्या वेळा पाळण्यासंदर्भात कडक निर्बंध राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. 
खतांचा काळाबाजार केल्यास कारवाई
युरीया असो की इतर कोणत्याही खताची कमतरता भासू नये यावर लक्ष असून या संदर्भात कृषी विभागासोबतही बैठक घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणी युरीयाची जादा दराने विक्री केल्यास अथवा काळा बाजार केल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला. तक्रार आली नाही तरी खते, बियाणे विक्रीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. 

Web Title: 600 oxygen beds operational in 15 days in the district - Collector Abhijit Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव