चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:38 PM2019-08-14T17:38:45+5:302019-08-14T17:40:51+5:30

‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.

 3-year-old Shivaji Marathe of Chalisgaon gave fond memories | चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्य दिन विशेष :भारत मातेच्या जयजयकारात फडकला तिरंगा !

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : ‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.
शिवाजी मराठे यांच्या मनात बालपणीच देशभक्तीची ज्योत पेटली होती. घरची परिस्थिती बेताची असली तरी देशासाठी काही तरी करण्याचा संकल्पही त्यांनी मनोमन रुजवून घेतला होता. १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात हाती तिरंगा घेऊन त्यांनी सहभाग घेतला. ७३ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावर्षी १९४७ मध्ये ते पालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होतं अवघे आठ वर्ष. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.
रेडिओवरील भाषणांनी मिळाली प्रेरणा
स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, 'मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडील आणि शिक्षकांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य- पारतंत्र्य, स्वातंत्र्य लढा असे शब्द ऐकायला मिळायचे. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरुन ऐकली जायची. रेडिओवरील भाषणे ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची. ही भाषणे प्रेरणादायी असायची...’ १५ आॅगस्ट १९४७ची आठवण सांगताना त्यांचे डोळे भरुन आले. ते म्हणाले, ‘तो दिवस अजूनही स्मरणात आहे. त्यादिवशी भारत स्वातंत्र्य झाला म्हणून वंदे मातरमसह भारतमातेचा झालेला गजर अजूनही कानात रेंगाळतोय. मिळालेल्या मिठाईची चवही जिभेवर आहेच. शेवटच्या श्वासापर्यंत या आठवणी कायमच ताज्या राहतील...’
स्वार्थ बळावतो आहे
सद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, ‘युवापिढी चंगळवादासोबतच फेसबुकी आणि सेल्फीवादी झाली आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी...’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काश्मीरबाबतचा निर्णय योग्यच
‘काश्मीरमधील ३७० कलम हटवून आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण विश्वालाच भारतीय सार्वभौमत्वाचा योग्य तो संदेश दिला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्याला आता विकासाच्या प्रवाहात येता येईल. बहुमताचे सरकार असल्यानेच असे ऐतिहासिक निर्णय घेता येतात.. सरकार कुणाचेही असो त्याचा पाया देशप्रेमावर रचलेला असला पाहिजे....' काश्मीर निर्णयाविषयीदेखील अशा शब्दात शिवाजी मराठे यांनी सरकारची पाठराखण केली.
आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
शिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी ते १५ दिवस गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तीदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा भारतभरातील इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

Web Title:  3-year-old Shivaji Marathe of Chalisgaon gave fond memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.