कारागृहावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:25 AM2019-12-29T00:25:36+5:302019-12-29T00:26:54+5:30

५५६ कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या जालना येथील जिल्हा कारागृहात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बॅरेक, तटभिंतींसह कारागृह परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Watch 'CCTV' at the prison | कारागृहावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

कारागृहावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

Next
ठळक मुद्दे१८ कॅमेरे बसविले । कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी राबविला जातोय वाचनालयाचा उपक्रम

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ५५६ कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या जालना येथील जिल्हा कारागृहात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बॅरेक, तटभिंतींसह कारागृह परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे कैद्यांच्या हलचालींवर नजर ठेवली जात आहे. कैद्यांचे मनपरिवर्तन व्हावे, यासाठी वाचनालयाचा स्तुत्य उपक्रमही सुरू करण्यात आला असून, प्रत्येक कैद्याला एक पुस्तक दररोज उपलब्ध करून दिले जात आहे.
किरकोळ कारण आणि रागाच्या भरातून गुन्हे होतात आणि न्यायालयात शिक्षा झाल्यानंतर आरोपी कारागृहात जातात. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या कच्च्या कैद्यांनाही कारागृहात ठेवले जाते. जालना येथे ५५६ कैदी ठेवण्याची क्षमता असलेले कारागृह आहे. या कारागृहात सध्या २०६ कैदी असून, यात ११ महिलांचाही समावेश आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेले दोन, पाच वर्षाची शिक्षा झालेला एक अशा विविध प्रकारच्या शिक्षा झालेल्या कैद्यांसह इतर कच्चे कैदी सध्या या कारागृहात आहेत. कारागृहात कैद्यांचे मनपरिवर्तन व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने प्रत्येक सोमवारी मार्गदर्शन शिबीर घेतले जाते. आरोग्यासाठी सहा महिन्यानंतर योगाचे प्रशिक्षण दिले जाते. दररोजची हजेरी, प्रार्थना, राष्ट्रगित झाल्यानंतर कैद्यांकडून योगा, प्राणायम करून घेतले जाते.
महात्मा गांधीजी यांच्या विचारांची पुस्तके कैद्यांना वाचण्यास देऊन परीक्षा घेतली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक कैद्याने रोज पुस्तक वाचावे, यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. कारागृहातील वाचनालयात जवळपास एक हजारहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. त्याशिवाय शासकीय वाचनालयात नोंदणी करण्यात आली असून, आठवड्याला १०० पुस्तके आणली जातात. कैद्यांच्या मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा केला जातो. वाचनासाठी वर्तमानपत्रही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कैद्यांनी रिकाम्या वेळेत वेगळे विचार न करता वाचनात मग्न रहावे, चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून त्यांचे मन परिवर्तित व्हावे, या दृष्टीने कारागृह प्रशासन प्रयत्न करीत आहे.

प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न
कारागृहात आलेल्या कैद्यांचे मन परिवर्तित व्हावे, त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यात वाचनालयाचा अधिक परिणाम दिसून येतो. विशेषत: कारागृहात येणाऱ्या कैद्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
- अरूणा मुगुटराव,
कारागृह अधीक्षक, जालना

Web Title: Watch 'CCTV' at the prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.