Voters will get support - Baburao Kulkarni | मतदारांची साथ मिळणारच- बाबूराव कुलकर्णी
मतदारांची साथ मिळणारच- बाबूराव कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन प्रचाराला वेग दिला आहे. मध्यंतरी घोडेबाजाराच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मतदारांचे मन वळवून आपला हेतू प्रामाणिक असल्याचेही कुलकर्णी हे प्रचारादरम्यान सांगताना दिसून आले.
गेल्या दोन दिवसांपासून बाबूराव कुलकर्णी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आ. राजेश टोपे, काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, माजी सभापती भीमराव डोंगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी हे कुलकर्णी यांच्यासोबत प्रचारासाठी एकत्र आले आहेत.
मध्यंतरी युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि आपण स्वत: एक पत्रक काढून आम्ही घोडेबाजाराला महत्त्व देणार नाही, असे सांगितले होते. परंतु, तो भाग केवळ निवडणुकीत नेहमीप्रमाणे मतदारांची पळवापळवी आणि चुकीचे आरोप त्यांच्यावर होऊ नयेत, यातून काढले असल्याचा खुलासा कुलकर्णींकडून मतदारांच्या बैठकीत केला जात
आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला असता तीन नगर पालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, त्यांची मतदार संख्या जालना जिल्ह्यात युतीच्या तुलनेत अधिक असल्याने ही सर्व मते आपल्यालाच मिळतील, असा विश्वास बाबूराव कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक गुरूवारी सहलीवर जाणार असल्याचीही जोरदार चर्चा होती.

Web Title: Voters will get support - Baburao Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.