Sudarshan Samaj Remarriage Manhas Nilul Phule Award | सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार
सुतार समाज पुनर्विवाह मंचास निळू फुले पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर या होत्या. तर सिने अभिनेते प्रवीण तरडे, त्र्यंबक मोकाशी, रमेश कोंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निळू फुले यांचे बंधू अशोक फुले यांच्या हस्ते हा पुरस्कार मंचाचे संस्थापक अध्यक्ष राजेश भालेकर यांनी स्वीकारला. याप्रसंगी अशोक फुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी सुनीता भालेकर, रवींद्र बोरशे, अनिल सोमवंशी, नागोजी पांचाळ, गणेश राऊत, विष्णू गरुड, गजानन जवरकर आदी समाजबांधव उपस्थित होते.
३९ पुनर्विवाह
सुतार समाजातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांच्या पुनर्विवाहाचा गंभीर प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. मात्र त्यांच्या विवाहासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
त्यांची व्यथा जाणून राजेश भालेकर यांनी जालना येथे १ जानेवारी २०१६ रोजी सुतार समाज पुनर्विवाह मंचाची स्थापना केली. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून विवाह इच्छुक वधू- वरांचा बायोडाटा व फोटोंची माहिती राज्यभर पोहोचवली जाते.
सध्या या कार्यात राज्यभरातून सुमारे ९० जण सहभागी झाले असून, ते कुठलाही मोबदला न घेता कार्य करतात. आजवर या मंचाने ३९ पुनर्विवाह यशस्वीपणे पार पाडले आहेत.


Web Title: Sudarshan Samaj Remarriage Manhas Nilul Phule Award
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.