राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:10 AM2020-01-05T01:10:55+5:302020-01-05T01:11:28+5:30

शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले

Stolen Jeep at Raheri; robberies in Naldurg, Nevasa | राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी येथे चोरलेल्या जीपचा वापर करून चोरट्यांनी नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील सराफा दुकान लुटले. तसेच नेवासा येथील सराफा, किराणा दुकान लुटले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत जीपसह ४ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना येथील एडीएसचे (दरोडा प्रतिबंधक पथक) पो.नि. यशवंत जाधव व त्यांचे सहकारी शुक्रवारी रात्री शहरात गस्त घालत होते. मस्तगड येथून गुरूग्लोबल स्कूलकडे जात असताना रमेश मुळे यांच्या शेतातून सहा ते सात जण हातात धारदार शस्त्रे घेऊन जाताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्या सात जणांनी जवळच उभ्या असलेल्या जीपमधून पळ काढला. त्यावेळी पथकाने जीपचा पाठलाग करून मंठा ते अंबड चौफुली मार्गावर जीपसमोर वाहन लावून जीपमधील चौघांना ताब्यात घेतले. जीपची तपासणी केली असता आतमध्ये एक तलवार, कुलूप तोडण्याची लोखंडी कटर, दोरी व इतर साहित्य आढळून आले.
पोलिसांनी किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक, दियासिंग बरीहमसिंग कलाणी (दोघे रा. जालना), गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव ता. जि. जालना), अनिल गोरखनाथ वलेकर (रा. काजळा ता. बदनापूर जि. जालना) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून जीपसह ४ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, कदीम ठाण्याचे पोनि. देविदास शेळके, पोहेकॉ. ज्ञानदेव नांगरे, पोहेकॉ नंदू खंदारे, पोना. किरण चव्हाण, पोकॉ. सचिन आर्य, पोकॉ. संदीप चिंचोले, पोकॉ. विजय निकाळजे, विजय निकाळजे, पोना गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, रमेश काळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोहेकॉ नागरे यांच्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यात वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सोनवळे हे करीत आहेत.
तिघांनी काढला पळ
एडीएस व कदीम पोलिसांनी जीप अडविल्यानंतर जीपमधील सातपैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेत तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सराफाचे दुकान हेच लक्ष्य
पोलिसांनी जेरबंद केलेले आरोपी अधिक प्रमाणात सोनाराची दुकाने टार्गेट करून चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी आजवर अनेक सराफाची दुकाने फोडली असून, चोऱ्यांसह इतर अनेक गुन्हेही जालन्यासह औरंगाबाद, बुलडाणा, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र बँक शाखेचे शटर तोडले
या चोरट्यांनी राहेरी (जि. बुलडाणा) येथून काही दिवसांपूर्वी एक जीप चोरली होती. या जीपचा वापर करून नेवासा येथील सोनाराचे दुकान व किराणा दुकान फोडले. औरंगाबाद पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील महाराष्ट्र बँकेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच नळदुर्ग (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) येथील सराफा दुकान फोडल्याची कबुली या चोरट्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Stolen Jeep at Raheri; robberies in Naldurg, Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.