भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:41 AM2019-09-30T00:41:31+5:302019-09-30T00:41:47+5:30

मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात.

Somthana Renuka Devi, a homage to devotees | भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी

भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी

googlenewsNext

दिलीप सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. रविवारपासून नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान, संस्थानकडूनही नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील डोंगरावर श्री रेणुका देवीचे मंदीर आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे नऊ दिवस भक्तांची गर्दी असते. हजारो भक्त दरवर्षी नवस फेडण्यासाठी येतात. या देवीची स्थापना साक्षात ब्रम्हदेवाने केल्याचे बोलले जाते. त्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची परिसरात ख्याती आहे.
या डोंगरावर एक छोटे कुंड आहे. या कुंडात बाराही महिने पाणी असते. कुंडात आंघोळ केल्यास सर्वरोग नाहीसे होतात, अशी भक्तांची भावना आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक भाविक येथे स्नान करण्यासाठी गर्दी करतात.
रेणुका मातेला दोन बहिणी असल्याचे बोलले जाते. एक बहिण याच डोंगराच्या पायथ्याशी तर दुसरी औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील डोंगरावर आहे.
यापुर्वी देवीला बोकड्याचा बळी देण्याची प्रथा होती. परंतु ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जैस्वाल व सर्व विश्वस्तांनी पुढाकार घेवून ही प्रथा मोडीस काढली. सातव्या माळेला भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.
धार्मिक : विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्री रेणुकादेवी व महादेव मंदिर संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त राजेंद्रकुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ रविवारपासूनच येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. यात हभप. अण्णासाहेब गिते, हभप. नारायण लहाने, हभप. रामचंद्र सिनगारे, हभप. रवींद्र मदने, हभप. बळीराम गिते आदींची कीर्तने होणार आहेत. विधिवत घटस्थापना, दररोज आरती, पुजा, काकडा भजन, ज्ञानेश्वरी प्रवचन, गाथा भजन, रामायण, भागवत, हरिपाठ, भारूड, जागरण गोंधळ, रोगनिदान व रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
बस सुरू करण्याची मागणी
नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. परंतु, ये-जा करण्यासाठी त्यांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने बस सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर सोमठाणा फाटा ते रेणुकागड हा रस्ता अरूंद आहे. त्यामुळे अनेक वेळा येथे वाहतूककोंडी होते.
यासाठी येथे पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीसही देण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Somthana Renuka Devi, a homage to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.