शिवघोषाने जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:25 AM2020-02-20T01:25:32+5:302020-02-20T01:26:29+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले

Shiv Gosh celebrated the birth anniversary | शिवघोषाने जयंती साजरी

शिवघोषाने जयंती साजरी

Next

जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात अनेक शिवप्रेमी तरुणांसह युवतींचाही लक्षणीय सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जालना शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणुका काढण्यात आल्या.
: जालना शहर व जिल्ह्यामध्ये शिवजयंतीनिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वत्र उत्साह दिसून आला. जुना जालना भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शिवप्रेमी तरुणांनी वाजतगाजत मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शहरातील विविध संस्था, संघटनांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक केला. संभाजी उद्यानापासून काढलेल्या रॅलीचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. सायंकाळी सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गांधी चमन येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीजे न लावता ढोल पथक तैनात करण्यात आले होते. त्यासाठी औरंगाबाद येथील ढोल पथकातील तरुण व युवतींनी लयबध्द चाल देऊन मिरवणुकीत चैतन्य निर्माण केले होते. मिरवणुकीत गणेश सुपारकर मित्रमंडळाच्या वतीने मल्लखांबचा चमू सहभागी झाला होता. या मल्लखांबावर युवकांनी केलेल्या कसरतीला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. अनेक युवक-युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉ जिजाऊ तसेच संभाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. दरम्यान, मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना विविध संघटनांच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली होती. मिरवणुकीच्या स्वागतासाठी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
गांधी चमन येथील कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुन खोतकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी केलेले कल्याणकारी राज्य ही आजही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले याचवेळी त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांवरचे जे चित्रण सध्या प्रसारित केले जात आहेफ ते मनाला न पटणारे आहे. एका राजाचे असे चित्रीकरण पाहताना मन हेलावून जात आहे. या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंकुशराव राऊत, समितीचे अध्यक्ष रवी राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, कोषाध्यक्ष सतीश जाधव, सचिव अ‍ॅड. रवींद्र डुरे, सहसचिव सागर देवकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, राजेंद्र राख, अक्षय गोरंट्याल, शीतल तनपुरे, विमल आगलावे, राजेश राऊत, गणेश राऊत, किरण गरड, मिर्झा बेग आदींची उपस्थिती होती.
जालना : शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये बुलेटवर स्वार झालेल्या युवतींनी फेटे बांधून भगवाध्वज फडकावल्याने वातावरण उत्साही होते.
परतूर : परतूर व परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये जालना येथील गोविंद गर्जना ढोल पथकाने लयबध्द ताल सादर करुन उत्साह भरला होता.
जाफराबाद : जाफराबादसह परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला भजनी मंडळानी सर्वांचे लक्ष वेधले होते.
भोकरदन : शहरासह आव्हाना येथे शिवप्रेमींनी मिरवणुकीत वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. आव्हाना येथे शिवशाहीचा देखावा सादर केला.
बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
अंबड : अंबड शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोठी गर्दी होती.
मंठा : शहर व परिसरात जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
घनसावंगी : घनसावंगीसह तालुक्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. महिलांचाही मिरवणुकीतील सहभाग लक्षणीय होता.

Web Title: Shiv Gosh celebrated the birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.