अध्यक्षपदासाठी जोरबैठका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:48 AM2019-12-27T00:48:45+5:302019-12-27T00:49:39+5:30

जालना जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सहा जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Rushing to the Presidency ... | अध्यक्षपदासाठी जोरबैठका...

अध्यक्षपदासाठी जोरबैठका...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सहा जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यापूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथे त्यांच्या पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली. गुरूवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या एकत्रित बैठका झाल्या. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती कोणाचे असावेत यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना जिल्हा परिषदेत आज घडीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच सभापतीपद वाटून गेल्या अडीच वर्षापासून सांभाळात आहेत. आता देखील अशीच महाविकास आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या दृष्टीने जोरदार हालचालींना वेग आला आहे. बुधवारी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सदस्यांची आज बैठक झाली. ही बैठक अध्यक्ष खोतकर यांच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी झाली. याच मुद्याला धरून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादीचे नेते आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आ. अरविंद चव्हाण आदींची एक बैठक झाल्याचे समजते. परंतु या बैठकीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, काही सदस्यांची पळवापळवी भाजपकडून केली जात असल्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. शिवसेना अध्यक्षपदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, उपाध्यक्षपदी देखील शिवसेनेचा सदस्य देऊन चार विषय समित्यांवर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी तीन सदस्यांना संधी देण्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य : सहलीवर जाणार
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सर्व सदस्य हे सहलीवर जाणार असून, त्यांना सुरक्षीत स्थळी कुठे पाठवायचे या बद्दल चर्चा सुरू आहे. असे असले तरी, येत्या ३० डिसेंबरला जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती निवडीकडेही लक्ष लागून आहे, दगाफटका होऊ नये म्हणून सदस्य सहलीवर जाणार आहेत.
भाजपची जादू चालणार काय ?
भाजपचे जिल्हा परिषदेत सर्वात जास्त म्हणजे २२ सदस्य आहेत. त्यामुळे अध्यपदाच्या निवडीसाठी २८ सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे काही सर्व प्रकारचे हातखंडे वापरून काही जादू करतात काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात असून, दानवेंचे एकूण धक्कातंत्र लक्षात घेता, महाविकास आघाडीचे नेते ताकही फुंकून पीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Rushing to the Presidency ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.