घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:54 AM2019-10-25T01:54:05+5:302019-10-25T01:54:12+5:30

घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला

Rajesh Tope dominated Ghanasavangi | घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

घनसावंगीवर राजेश टोपे यांचे वर्चस्व कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी/ कुंभार पिंपळगाव: घनसावंगी मतदार संघात गुरूवारी झालेल्या मतमोजणीत प्रक्रियेत प्रशासकीय कासवगती आणि तांत्रिक अडचणीचा कहर झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांना शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी मोठे आव्हान दिले होते. अखेरच्या फेरीत तीन ठिकाणच्या मशीनला तांत्रिक अडचणी आल्याने निकाल हाती लागण्यास मोठा उशीर झाला. मात्र, तीन हजारांच्या आसपास टोपे यांना मताधिक्य मिळाल्याने टोपे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघ सलग चार वेळेस आपल्या ताब्यात ठेवला आहे. पाचव्या वेळेस यंदा झालेल्या निवडणुकीत टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी तगडे आव्हान दिले होते. टोपे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या. तर उढाण यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे या मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले होते.
राजेश टोपे यांनी मंत्रीपद असताना व विरोधी पक्षात काम करताना केलेल्या विकास कामांची माहिती देत प्रचार यंत्रणा राबविली होती. शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणेवरही त्यांनी जोर दिला होता. तर शिवसेनेचे उढाण यांनी मतदार संघातील प्रश्नांना हात घालत टोपे यांच्यावर आरोपांच्या फैरी केल्या होत्या. शिवाय साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. शहरी, ग्रामीण भागातील प्रश्नांना उढाण यांनी हात घातल्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर झाल्याचे मतमोजणीत दिसून आले. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये टोपे यांना मिळालेली लीड उढाण यांनी मोडीत काढली होती. त्यानंतर मात्र, शेवटच्या टप्प्यापर्यंत उढाण यांचीच आघाडी कायम होती. टोपे यांच्या अनेक समर्थकांनी पराभव ग्राह्य धरला होता. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये राजेश टोपे यांना मताधिक्य मिळाले.
राजेश टोपे यांना जवळपास तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, अंतिम फेरीत काही मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अभियंत्यांना पाचरण करण्यात आले होते. मात्र, अटी-तटीची लढत झालेल्या या मतदार संघातील निकालाकडे अवघ्या जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती.
राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तांत्रिक बिघाड झालेल्या मतदान यंत्रातील मतदान १७०० च्या आसपास होते. त्यामुळे टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सकाळी ८ वाजल्यापासून या मतदार संघात सुरू झालेली मतमोजणी ही कासव गतीनेच होती. मतमोजणी प्रक्रिया सर्वात संथ गतीने सुरू राहिल्याने उमेदवारांसह समर्थकांमध्येही तणावाचे वातावरण होते. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनीही याकडे लक्ष देऊन तो दूर करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा प्रशासनाने निकाल जाहीर करून टोपे यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले.
अटी-तटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेरच्या फेरीदरम्यान राजेश टोपे यांनी साधारणत: तीन हजारांहून अधिकचे मताधिक्य घेतले होते. ज्या मतदान यंत्रामध्ये बिघाड होता, त्यात मतदानाची संख्या कमी होती. त्यामुळे राजेश टोपे यांचा विजय निश्चित मानून समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी टोपे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. अनेक फेºयांमध्ये उढाण हे पुढे असल्याने समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, अखेरच्या फे-यांमध्ये टोपे यांनी बाजी मारली.
टोपे यांना १०७८४९, हिकमत उढाण यांना १०४४४०, शेख हसनोद्दीन यांना १०७४, डॉ. अप्पासाहेब कदम यांना ५५५, अशोक आटोळे यांना ५९२, विष्णू शेळके यांना ९२९३, अमजद काजी यांना २५२, कल्याण चिमणे यांना ४७७, कैलास चोरमारे यांना ७२३ मते मिळाली.

Web Title: Rajesh Tope dominated Ghanasavangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.