सुखद ! कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:17 PM2021-06-18T17:17:44+5:302021-06-18T17:24:14+5:30

जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे.

Pleasant! 300 crore increase in turnover of Jalna Market Committee even during Corona period | सुखद ! कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

सुखद ! कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देजालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

- संजय देशमुख

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत मोडणाऱ्या जालना बाजार समितीने कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी करीत उलाढाल वाढविली आहे. ही उलाढाल जवळपास ३०० कोटींनी वाढली असून, चालू आर्थिक वर्षात ही उलाढाल थेट ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. जालना बाजार समिती ही राज्यात रोखीने व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असून, येथील घाऊक व्यापारी हे भुसार मालाची आवक बाजार समितीत झाल्यास लगेचच त्यांचे पैसे अदा करत असल्याने येथे व्यवहाराला मोठे महत्त्व प्राप्त होते. जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे. विशेष करून कोरोना काळात सर्वत्र भयावह चित्र असतानाही बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यासाठी जातीने लक्ष घालून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठी मदत केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात भुसार, शेती तसेच कृषी मालाची मोठी आवक झाली. त्यात विशेष करून सोयाबीन आणि कपाशीचा मोठा समावेश होता. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. कापूस खरेदीसाठीदेखील बाजार समितीचे सभापती खोतकर यांनी पणन महासंघाची मुदत संपल्यावरही शेततकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक होता. त्यासाठी जिनिंग मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी केला. तो साठवणुकीसाठी मोठमोठे पत्राचे शेड उभारून त्यात कापूस साठवून नंतर तो जिनिंगमध्ये गठाण तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्यंतरी बाजार समितीचे जे शुल्क होते, ते मिळण्यास अडचणी येत होत्या. हे शुल्क रद्द केले होते. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यात बाजार समितीचे हक्काचे शुल्क हे राज्य सरकारने त्यांना दिलेच पाहिजे असे आदेश न्यायालयाने दिल्याने ते थकलेले ४० लाख रुपये देखील लवकरच प्राप्त होतील असेही इंगळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी, व्यापाऱ्यांचे हित महत्त्वाचे
बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांना अडचण येऊ नये हा हेतू आहे. तसेच गेल्या दीड वर्षात कोरोनाचा कहर होता. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची विक्री करताना त्यांना अडचण येऊ नये. तसेच व्यापाऱ्यांनाही या मालाची खरेदी करण्यासाठी मदत केली. या समन्वयामुळे जालना बाजार समितीची उलाढाल ही ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. विविध बँकांकडून बाजार समितीने घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केल्याने बाजार समिती स्वयंपूर्ण झाली आहे.
- अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती जालना,

Web Title: Pleasant! 300 crore increase in turnover of Jalna Market Committee even during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.