जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:19 AM2020-03-17T00:19:22+5:302020-03-17T00:20:06+5:30

सोमवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्दाचा बळी गेल्याची संतप्त भावना शहरवासिय व्यक्त करीत आहेत.

Older victim killed by heavy vehicle; Stonework on the truck | जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक

जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै २०१८ मध्ये आदेश काढून शहरातील ८ मार्गावरून जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी आहे. मात्र, या प्रवेशबंदी आदेशाचे ना चालक पालन करतात ना वाहतूक शाखा याकडे लक्ष देते. प्रशासकीय अनास्थेमुळे सोमवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्दाचा बळी गेल्याची संतप्त भावना शहरवासिय व्यक्त करीत आहेत.
जालना शहरात जड वाहने येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जुलै २०१८ मध्ये आदेश काढून आठ मार्गावरून जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली होती. विशेषत: सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत ही प्रवेशबंदी आहे. मात्र, सर्रास शहरात जड वाहने येत असून, या जड वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोेंडी होते. जड वाहनांच्या प्रवेशबंदी आदेशा पाळला असता तर हा अपघात झाला नसता असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
परिणामी सोमवारी सकाळी सुभाष चौकाजवळ एका ट्रकने (क्र. एम.एच.२१- ९४९६) धडक दिल्याने कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली.
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि महाजन, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. या प्रकरणात मयताचा मुलगा मंगल कन्हैय्यालाल गारे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूध्द सदरबाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, तपास पोउपनि चव्हाण हे करीत आहेत. यावेळी मराठा महासंघाचे अरविंद देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वृध्दाचा मृतदेह हलविण्यासह वातावरण शांत करण्यास मदत केली.
पोलीस अधीक्षकांनी
सूचना द्याव्यात
शहरातील विविध मार्गावर जड वाहने फिरत आहेत. जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी जड वाहनांना निर्धारित वेळेत शहरात प्रवेशबंदी आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे, रेमेश देहेडकर यांनी वारंवार पाठपुरवा केला होता. यापूर्वीही असे अनेक बळी जड वाहतुकीने घेतले.

Web Title: Older victim killed by heavy vehicle; Stonework on the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.