महावितरणला मनसेचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:33 AM2019-11-29T00:33:23+5:302019-11-29T00:33:39+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली

MNS 'blow' to Mahavitaran | महावितरणला मनसेचा ‘झटका’

महावितरणला मनसेचा ‘झटका’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा/तळणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. वेळोवेळी मागण्या करूनही शेतकरी, सर्वसामान्य ग्राहकांचे वीजेचे प्रश्न सोडविण्याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. रोहित्र जळालेले असताना ते दुरूस्त करून दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात असून, शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. तर अनेकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत.
त्यामुळे महावितरण कंपनीने शहरी, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, थकीत वीज बिलाच्या वसुलीचे कारण पुढे करीत गावा-गावातील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शेतकरी, सर्वसामान्यांसमोर असलेला विजेचा प्रश्न सोडविण्याऐवजी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने संतप्त झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिध्देश्वर काकडे, सचिन काकडे, संतोष सहा (रा.जयपूर ता. मंठा जि.जालना) व इतर कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत खळखट्याक आंदोलाचा ‘झटका’ दिल्याने महावितरण कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोनि विलास निकम व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणात संबंधितांविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनसेचे आक्रमक आंदोलन आणि त्यानंतर महावितरणकडून दिली जाणारी सेवा याकडे तालुकावासियांचे लक्ष वेधले आहे.
गुन्हा दाखल: पंचायत समितीतही केली होती तोडफोड
मनसेच्या या कार्यकर्त्यांनी यापूर्वी पंचायत समिती प्रशासनाकडे पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पंचायत समिती कार्यालयातही खळखट्याक आंदोलन करीत तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या कार्यकर्त्यांनी महावितरणला आंदोलनाचा चांगलाच ‘शॉक’ दिला आहे.

Web Title: MNS 'blow' to Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.