जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:37 AM2020-01-12T00:37:26+5:302020-01-12T00:37:59+5:30

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’चे नाट्यकर्मी तथा लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या लेखणी, दिग्दर्शन, कलाकारीतून जांबसमर्थचे (ता.घनसावंगी) नाव राज्याच्या नव्हे देशाच्या पटलावर केले आहे

Jamba Samartha's Artist in Film Fiction | जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

Next

अशोक डोरले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’चे नाट्यकर्मी तथा लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या लेखणी, दिग्दर्शन, कलाकारीतून जांबसमर्थचे (ता.घनसावंगी) नाव राज्याच्या नव्हे देशाच्या पटलावर केले आहे. चित्रपट सृष्टीला विविध दर्जेदार नाटके देणाऱ्या या लेखक, कलावंताच्या ऊसतोड कामगाराच्या जीवनावरील ‘चिवटी’ चित्रपटाची पुणे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ या लहानशा गावात राजकुमार तांगडे नावाचा समर्थ नाटककार जन्माला आला. मात्र, लेखनाची निसर्गदत्त देणगी लाभलेला भाग्यवंत भलेही खेड्यात राहणारा असला तरी त्याच्या अंतरंगातून उगवून वर येणारे कलाकृतीचे धुमारे धुंद-फुंद करणारे आणि व्यवस्थेवर कडवट भाष्य करणारे आहेत. कठोर शब्द मुठीत घेऊन साहित्य क्षेत्रात प्रबोधनाची पेरणी करणारा हा शेतकरी कलावंत. काय दिल स्वातंत्र्याने ? श्वेतअंगार, आकडा, शिवाजी... आणि नव्याने येत असलेल्या ‘चिवटी’ चित्रपटातून त्यांच्यातल्या सृजन लेखकाची जाणीव करून देतात. त्या शिवाय ते अनेक चित्रपट, लघुपटांतून भूमिका साकारताना दिसतात.
राजकुमार तांगडे यांच्या लेखनाची दखल आता पुण्या-मुंबईतल्या लोकांना घ्यावी लागत आहे. नव्हे, नाटक हा विषय जेव्हा कुठे निघतो तेव्हा त्यांना वगळून जमणार नाही, ही क्षमता त्यांनी आपल्या लेखनात निर्माण केली आहे. त्यांच्या अवती भवतीचा विषण्ण करणारा प्रदेश त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहे. म्हणूनच त्यांचे लेखन कुठल्याही प्रकारचा कृत्रिम अलंकार घेऊन वावरत नाही. किंबहुना त्यांच्या लेखनाला मुळातच मातीचा गंध आहे. मातीच्या मुळातली वेदना आहे. त्यांच्या साहित्यकृतीतून प्रतीत होणारे वास्तव त्यांनी भोगलेले, पाहिलेले असतात. तेव्हाच त्यांचे लेखन प्रचंड शक्तीने व्यक्त झालेले असते. ते शेतकरी असल्याने त्यांच्या साहित्यात जिवंतपणा दिसतो.
‘शिवाजी...’ या नाटकाची राजकुमार तांगडे नी संहिता लिहली आणि नाटक एक ऐतिहासिक दस्तावेज बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि वास्तव याचं सत्य दर्शन त्यातून घडते.
पारंपरिक इतिहासाने निर्माण केलेले प्रश्न पुन्हा सतावत होते. नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत ठरला. कुतूहल खूप होते, कसे नाटक होते याचे!
नाटकाचा प्रयोग झाला आणि सर्वत्र एकच नाव झळकू लागल ते म्हणजे राजकुमार तांगडे. खूप मोठे यश या नाटकाला मिळाले; नव्हे ते त्या दर्जाचेच होते, हे त्या नाटकाने सिध्द केले.
उसतोड कामगारांच्या जीवनावर त्यांनी ‘चिवटी’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
वर्तमानाची नोंद घेणारी लेखणी
खूप मेहनत घेऊन सिध्द झालेला राजकुमार तांगडे हे कलावंत. आज अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. देश-विदेशात हा मान त्यांना मिळला. दृष्टी असलेला हा लेखक आहे. मातीच्या गंधाने पुलकित झालेले मातीचे हात. लेखणी हातात घेऊन इथल्या वर्तमानाची नोंद घेत आहेत. हे आशादायी चित्र यानिमित्त दिसून येत असून, राजकुमार तांगडे नाट्य क्षेत्राला लाभलेले लेणे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Web Title: Jamba Samartha's Artist in Film Fiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.