Jalna district has 211 deaths of new born babies in a year | जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असली तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात आजही कुपोषण, विविध आजार, अज्ञान, जुन्या परंपरेमुळे आधुनिक उपचार घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक विवाहित महिला गरोदर राहण्याच्या काळापासून काळजी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे उपजत, नवजात अर्भक तसेच 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या अवस्थेमुळे अनेक वेळा मातांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जालना जिल्ह्यात २०१८ -१९ या वर्षात 0 ते ५ वर्षे वयोगटातील २११ बालकांचा मृत्यू झाला आहे. सदर बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. बालमृत्यूंची संख्या पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात काळजी घेणे गरजेचे आहे.
२५६ उपजत मृत्यू
जिल्ह्यात २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. कुपोषणामुळे आईच्या पोटात असलेल्या बाळाचे पोषण होत नाही. त्यामुळे अशा बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू होत असतो. अशा प्रकारे २५६ उपजत मृत्यू झाले आहेत. त्यात जालना तालुक्यात ८, अंबड ३, बदनापूर २०, भोकरदन १०, घनसावंगी १०, जाफराबाद ५, मंठा ११, परतूर तालुक्यातील १८ उपजत मृत्यूंचा समावेश आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयात १७३ उपजत मृत्यू झाले आहेत.
बालमृत्यू अन्वेषण !
बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आणि भविष्यात होणारे हे मृत्यू टाळणे यासाठी जिल्हास्तरावर बाल मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली आहे. दरमहा समितीची बैठक होत असते.


Web Title:  Jalna district has 211 deaths of new born babies in a year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.