वर्दळ असलेला महामार्ग ठप्प..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:16 AM2020-03-23T00:16:53+5:302020-03-23T00:17:02+5:30

मराठवाडा- विदर्भ, आंध्र प्रदेशाला जोडणारा जालना- औरंगाबाद महामार्ग रविवारी पूर्णपणे थांबला होता.

Highway without traffic | वर्दळ असलेला महामार्ग ठप्प..!

वर्दळ असलेला महामार्ग ठप्प..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : कोरोना विषाणूला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामुळे मराठवाडा- विदर्भ, आंध्र प्रदेशाला जोडणारा जालना- औरंगाबाद महामार्ग रविवारी पूर्णपणे थांबला होता.
जनतेने स्वयंस्फूर्तीने पंतप्रधानांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. एखाद्या कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी लावलेल्या कर्फ्यूपेक्षाही अधिक चांगला प्रतिसाद जनतेने दिला. जालना- औरंगाबाद या महामार्गावरून २४ तास वाहने धावतात. हा महामार्ग मराठवाड्याला विदर्भाशी व आंध्र, तेलंगणा अशा अनेक राज्यांना जोडणारा महामार्ग म्हणून ओळखला जातो. महामार्गावर ट्रेलर, ट्रक, ट्रॅव्हल्स, एसटी बसेस, टेम्पो, जीप, कार, दुचाकी अशी अनेक प्रकारची वाहने रात्रंदिवस धावतात. मात्र, हा महामार्ग रविवारी बंद होता. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला. बदनापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. कोरोनाशी सुरू असलेल्या युध्दात असाच सहभाग नोंदविणार असल्याचे अनेकांनी सांगितले.
भोकरदन तालुका ठप्प
भोकरदन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याला भोकरदन शहरासह तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. नेहमी गर्दी असणारी ठिकाणे रविवारी ओस पडली होती. तर बसस्थानकात सुध्दा प्रवासी दिसून आले नाहीत. मुख्य रस्ते ओस पडले होते. शहरासह ग्रामीण भागातही अशीच स्थिती होती.
जगात कोरोना विषाणूची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम भारत देशावरही जाणवत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून जाहीर केला होता. त्याला भोकरदन शहासह तालुक्यातील ग्रामस्थांनी शंंभर टक्के प्रतिसाद दिला. रविवारी सकाळी ७ वाजता नेहमी ग्रामीण भागातून दूध घेऊन येणारे नागरिकही आले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सुध्दा आजाराबाबत जागरूकता झाल्याचे दिसून आले. तर भोकरदन शहरातील नेहमी गर्दीने गजबजणारे सराफा मार्केट, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जाफराबाद रोड, जालना रस्ता, महात्मा फुले चौकात शांतता होती. तालुक्यातील पारध, वालसावंगी, वडोद तांगडा, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, जळगाव सपकाळ, आन्वा, दानापूर, वाकडी, सिपोरा बजार, हसनाबाद, राजूर, तळेगाव, पिंपळगाव कोलते, आव्हाना, बरंजळा साबळे, केदारखेडा या ग्रामीण भागात सुध्दा नागरिक घराबाहेर पडले नाहीत. कोठेही दुकाने सुरू नव्हती. त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस जनता कर्फ्यू म्हणून यशस्वी झाल्याचे दिसून आले.
भोकरदन शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवा व औषधी दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होती. शिवाय या जनता कर्फ्यूबाबत कोठे काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्वच रस्त्यावर व चौकात केवळ पोलीस कर्मचारीच दिसून आले. ग्रामीण भागात सुध्दा पोलिसांच्या गाड्या प्रत्येक गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करीत होत्या. पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा पोलीस कर्मचारी व दोन अधिकारी बंदोबस्तासाठी कार्यरत होते, असे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले.
भोकरदन शहरासह ग्रामीण भागात सुध्दा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुध्दा जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी झाल्याचे सपोनि शेळके यांनी सांगितले़
भोकरदन तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी हे रविवारी दिवसभर आपआपल्या नेमून दिलेल्या गावात आपले कर्तव्य निभावताना दिसून आले. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कायमस्वरूपी कमी करण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी अशाच पध्दतीने साथ दिली तर लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव देशातून कमी होईल, असे अनेकांनी सांगितले.
परतूर तालुक्यात ऐतिहासिक बंद...
परतूर : परतूर शहरात रविवारी ऐतिहासिक बंद पाळण्यात आला. शहरातील रस्त्यावर शांतता होती. गावा-गावातील नागरिकांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. शहरात शनिवारपासूनच बंद सुरू झाला होता. रविवारी या बंदला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. शहरातील सर्व प्रतिष्ठाने, हॉटेल्स, फेरीवाले सर्व काही बंद होते. रेल्वे, बस व इतर वाहनांची वर्दळ बंद होती. परिणामी नेहमी गजबजलेले चौक, रस्ते, निर्मनुष्य दिसत होते. यापूर्वी अनेकदा राजकीय व इतर कारणांनी बंद पाळण्यात आले. मात्र, यावेळी प्रथमच एखाद्या आजाराविरोधात लढा देण्यासाठी कोणीही घराबाहेर पडले नाही. बससेवा बंद असल्याने बसस्थानक ओसाड पडले होते. सर्व बस आगारात थांबल्या होत्या. रेल्वे सेवाही बंद असल्याने सतत गजबजलेले रेल्वे स्थानक निर्मनुष्य दिसून आले. शासकीय रूग्णालयात रूग्णासाठी सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. सकाळपासून १८ रूग्ण उपचारासाठी आले होते. १२ रूग्ण हे सर्दी खोकल्याने ग्रस्त होते. ६ रूग्ण इतर आजारांचे असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कमालीचा शुकशुकाट आढळला. तालुक्यातून बाहेर गावी म्हणजे पुणे, मुंबईसह इतर शहरात कामासाठी गेलेले मजूर परतत आहेत. मात्र, परत आपल्या गावी आलेल्या या लोकांना गावात येण्यास मज्जाव केला जात आहे. बंदसाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय अधिकारी सोपान बांगर यांनी विशेष काळजी घेतली. शहरात या बंदच्या काळात विशेष गस्त घालून नागरिकांना बाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रविवारी पहाटे सहाच्या सुमारास मुंबईकडून येणाऱ्या देवगीरी एक्सप्रेस मधून परतूर रेल्वे स्थानकावर जवळपास शंभर ते दीडशे प्रवासी उतरले. हे सर्व प्रवासी शहरात व इतर गावी गेले. या ठिकाणी या प्रवाशांना तपासण्यासाठी एकही पथक किंवा याची माहिती घेण्यासाठी स्थानकात कोणीच नव्हते. त्यामुळे हे प्रवासी शहरात आले की ग्रामीण भागात गेले याचीच चर्चा होती.
दरम्यान, रेल्वे स्थानकावर रविवारी पहाटे आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Highway without traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.