नववर्षाची शुभवार्ता: नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवा कंदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 11:43 AM2022-01-01T11:43:57+5:302022-01-01T11:47:23+5:30

Nanded to Manmad railway track doubling : दोन टप्प्यांत काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.  

Good news on New Year start; Green light for Nanded to Manmad railway track doubling | नववर्षाची शुभवार्ता: नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवा कंदिल

नववर्षाची शुभवार्ता: नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवा कंदिल

googlenewsNext

भोकरदन (जि. जालना) : नांदेड-मनमाड ब्रॉडगेजच्या दुहेरीकरणाला (Nanded to Manmad railway track doubling) रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असून, दोन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अंकाई (मनमाड) ते औरंगाबाददरम्यान ९८ किलोमीटरवरील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे मराठवाड्याला ही नववर्षाची भेट ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात अंकाई (मनमाड) ते औरंगाबाद व दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड अशी या कामांची विभागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड-मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरणाची मागणी राजकीय पक्ष व संघटनांकडून केली जात होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने झाली; परंतु या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरीकरणाचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याची चर्चा होत होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन याबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर अम्ब्रेला योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात अंकाई (मनमाड) ते औरंगाबाददरम्यानच्या ९८ किलोमीटरवरील ब्रॉडगेज दुहेरीकरणाला मान्यता मिळवून दिली. १७ डिसेंबर रोजी दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे काम त्वरित पूर्ण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड ब्रॉडगेज दुहेरीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

अम्ब्रेला योजनेत रुंदीकरण, दुहेरीकरण व अन्य काही कामे करण्यास एकत्रितपणे निधी दिला जातो. योजनेत कोणती कामे समाविष्ट करायची, याचे सर्व अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत. तसेच या कामाची रक्कम एक हजार कोटींपेक्षा कमी असावी, अशी अट आहे. नांदेड ते मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण प्रकल्पासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च लागण्याची शक्यता असल्याने त्यासाठी निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सदर विषय न्यावा लागणार होता. म्हणून दानवे यांनी हा विषय निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर न जाऊ देता, पहिल्या टप्प्यात योजनेंतर्गत ९८ किलोमीटरच्या कामाला रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवून घेतली. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, या व्यतिरिक्त शिल्लक असलेला मार्ग दुसऱ्या टप्प्यात अम्ब्रेला योजनेंतर्गत घेऊन पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

Web Title: Good news on New Year start; Green light for Nanded to Manmad railway track doubling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.