Free soil testing of four thousand farmers ... | चार हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण...
चार हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण...

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढत्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्याकडून तब्बल ४ हजार ३९० शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोफत मातीपरीक्षण करुन दिल्याने खरीप पेरणीच्या वेळी शेतक-यांना चांगला फायदा झाला.
सलगच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करत आहेत. परिणामी दिवसे- दिवस शेतीचे आरोग्य बिघडत चालेले आहे. शेतीत खर्च करुन पुरेशा प्रमाणात उत्पन्न न निघाल्याने अनेक शेतकरी हतबल होतात. यातूनच आत्महत्या सारख्या घटना घडत आहेत. यामुळे शेतक-यामध्ये जनजागृती करुन पेरणीपूर्वी शेतक-यांच्या जमिनीची आरोग्य तपासणी करुन जमिनीत कोण- कोणत्या घटकांची कमतरता आहे. याची माहिती द्यावी, या चांगल्या हेतूने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत २०१९ या आर्थिक वर्षापासून केंद्र आणि राज्यशासनाने पायटल प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतक-यांच्या जमिनीची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाला सूचना करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात मृदा परीक्षण विभागाने ४ हजार ३९० शेतक-यांचे मोफत माती परीक्षण करुन दिले.
तसेच रासायनिक खताचा वापर थांबवून शेणखताचा वापर शेतात करावा याबाबत शेतक-यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचा फायदा शेतक-यांना होत आहे.
शेतक-यांच्या शेतातील माती परीक्षणातून स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हा मृद विभागाच्या वतीने शेतक-यांना माती परीक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी यावर्षी केंद्र आणि राज्य शासनाने २०१९ - २०२० या वर्षासाठी पायलट योजनेअंतर्गत शेतक-यांच्या जमिनिचे माती परीक्षण मोफत करण्यात येत आहे.
माती परीक्षणाच्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. पूर्वी १० हेक्टरच्या परिसरातील एका शेतक-याच्या जमिनीत माती नमुन्याची तपासणी करुन परिसरातील दहा शेतक-यांना सारखाचा माती परीक्षणाचा अहवाल देण्यात येत होता. अनेकवेळा यात गफलत होत असल्याने शेतक-यांचे नुकसान व्हायचे यामुळे शासनाने यात बदल करुन आरोग्य पत्रिका वाटप केलेल्या आहेत.
प्रत्येक खातेदाराच्या शेतातील माती नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश शासनाने मृद तपासणी विभागाला दिले होते. यामुळे पहिल्या टप्प्यात जालना तालुक्यातील धावेडी, बदनापूर तालुक्यातील पाडळी भोकरदनमधून सुबानपूर, जाफराबाद मधून पिंपळखुटा, परतूरमधून आनंदगाव, मंठा तालुक्यातून पांगरी खुर्द, अंबड, मार्डी, घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव आदी गावातील शेतक-यांचे माती परीक्षण करण्यात आले.


Web Title: Free soil testing of four thousand farmers ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.