चार वर्षांत १४ देशांना मशीन्स निर्यात; जालन्याच्या आदिवासी भावंडांच्या उद्योगाला मानाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 06:33 PM2021-08-30T18:33:15+5:302021-08-30T18:35:53+5:30

जालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती.

Exporting machines to 14 countries in four years; Honorable mention to the industry of the tribal siblings of Jalna | चार वर्षांत १४ देशांना मशीन्स निर्यात; जालन्याच्या आदिवासी भावंडांच्या उद्योगाला मानाचा पुरस्कार

चार वर्षांत १४ देशांना मशीन्स निर्यात; जालन्याच्या आदिवासी भावंडांच्या उद्योगाला मानाचा पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देजालन्याच्या आदिवासी भावंडांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुराप्रतिष्ठेचा दिलीप दोशी पुरस्कार मिळवणारा मराठवाड्यातून एकमेव उद्योग

जालना : भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा येथील मूळचे रहिवासी असलेल्या पाडळे बंधूंनी चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्लास्टिकच्या टाक्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी उत्पादनाची दखल एमआयडीसीने घेतली. त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला दिलीप दोशी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

जालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती. या चार वर्षांत कुशल कामगार तसेच उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी ही कंपनी नावारूपाला आणली. चार वर्षांत त्यांनी उत्पादनांची देशासह परदेशात निर्यात केली. त्यांच्या या कार्याची दखल एमआयडीसीने घेऊन त्यांना यंदाचा दिलीप दोशी स्मृती पुरस्कार जाहीर केला होता. त्याचे ऑनलाईन वितरण शनिवारी पार पडले.

या पुरस्काराचे स्वरूप रोख ५० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह असे आहे. हा पुरस्कार मराठवाड्यातून जालन्यातील आदिवासी भावंडांनी उभ्या केलेल्या उद्योगास मिळाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. शनिवारी पुरस्कार वितरणानंतर कंपनीत संचालकांसह कामगार आणि व्यवस्थापनाने पेढे वाटून त्याचे स्वागत केले. यावेळी कंपनीचे संचालक रत्नाकर पाडळे, नारायण पाडळे, भगवान पाडळे, संतोष पाडळे, भूषण खडके, वरिष्ठ अधिकारी प्रसन्ना देशपांडे आणि श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती.

कोरोना काळातही निर्यात केली
उद्योग, व्यवसाय उभारणीचा कुठलाही आधार नसताना या चार भावंडांनी अत्यंत कष्टातून हा उद्योग स्थापन केला. त्यात त्यांनी चार वर्षांत १४ देशांना आपल्या मशीन्स निर्यात केल्या आहेत. कोरोनातही या भावडांनी ही किमया साधली. सध्या कंपनीत पाडळे बंधूंनी जवळपास १८ कोटी रुपये गुंतवून ७६ जणांना रोजगार दिला आहे. चारही पाडळे बंधू यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करून नंतर स्वत:ची कंपनी स्थापन केली.

Web Title: Exporting machines to 14 countries in four years; Honorable mention to the industry of the tribal siblings of Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.