शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:09 AM2020-03-25T00:09:57+5:302020-03-25T00:13:04+5:30

यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे

Education department stopped 2 children's migration | शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

googlenewsNext

दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी तीन वर्षांपासून राज्यात ‘विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार दरवर्षी शिक्षण विभागाच्यावतीने उसतोड कामगारांचे प्रबोधन करून स्थलांतर थांबविण्यात येते. यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे.
कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की मोठ्या प्रमाण जिल्ह्यातून ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह स्थलांतर करतात. यामुळे अनेक मुला-मुलींचे अर्ध्यातच शिक्षण राहते. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. ते शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या पालकांचे प्रबोधन करून मुलांचे स्थलांतर रोखले जाते. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातही २०१९-२० यावर्षात हा उपक्रम राबविण्यात आला.
यात जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आले तर जे विद्यार्थी बाहेरगावी गेले, त्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन दुस-या शाळेत प्रवेश देण्यात आला. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात तेथील शिक्षकांकडून हे हमीपत्रक भरून घेऊन ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या शाळेत सादर करतात. जिल्ह्यातील ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला. यात जालना तालुक्यातील ८, बदनापूर ७५, अंबड ४१२, घनसावंगी ५५, परतूर १२०, मंठा ९, भोकरदन ४५ तर जाफराबाद तालुक्यातील १६ विद्यार्थ्यांना हमीपत्रक देण्यात आले. यासाठी सीईओ निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.
अंबड तालुका : सर्वाधिक स्थलांतर
अंबड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. अंबड तालुक्यातील जवळ ४१२ विद्यार्थी यावर्षी स्थलांतरित झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला आहे. अंबडमधील ८६७ विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यात आले तर परतूर तालुक्यातील १२० विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी वेळोवेळी बैठका घेऊन गटशिक्षण अधिकारी व इतर अधिका-यांना स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले होते.
अधिका-यांनी पालकांचे प्रबोधन करून जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले. पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून बालकांना घेऊन न जाण्याचे आवाहन केले होते.

Web Title: Education department stopped 2 children's migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.