Danwe's easy win by 3 lakh 32 thousand votes | तीन लाख ३२ हजार मतांनी दानवेंचा विक्रमी विजय
तीन लाख ३२ हजार मतांनी दानवेंचा विक्रमी विजय

लोकमत न्यूज नेटवर्क । जालना : जालना लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होईल असे अंदाज बांधले जात असतानाच ही निवडणूक तुलनेने दानवेंसाठी अत्यंत सहज आणि सोपी झाली. सकाळी आठ वाजेपासूनच भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रा बाहेर गर्दी केली होती. मात्र, जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागल्यावर मात्र, अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे निकाला ऐकण्यासाठीची गर्दी ही बोटावर मोजण्याइतकी रोडावली होती. प्रारंंभी मराठवाड्यातील अन्य ठिकाणचे निकाल हे बाहेर येत असताना मात्र, जालना जिल्ह्यात ही मतमोजणी अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे कार्यकर्ते त्यांना मिळतील तसे मतांचे आकडे हे सोशल मीडियावर पसरवत होते. शेवटी यात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मध्यस्थी करून मतमोजणीची गती वाढवली.
जालना लोकसभा मतदारसंघात यंदा रावसाहेब दानवेंच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून बराच खल काँग्रेसमध्ये सुरू होता. मध्यंतरी शिवसेनेचे राज्यमंत्री हे काँग्रेसमध्ये येण्याची अफवा पसरली. त्यात सिल्लोडचे आ. सत्तार हे मध्यस्थी करत होते. मात्र तसे झाले नाही. परंतु या सर्वांमध्ये आ. सत्तारांचीच काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. एकूणच मार्च महिना या सर्व घडामोडींचे केंद्र ठरला होता. अर्जुन खोतकर यांना माघार घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यामुळे ही निवडणूक दानवेंसाठी सोपी झाली.
जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंची जादू सलग पाचव्यांदा कायम राहिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनल होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक त्यांच्या पहिल्या निवडणूकी प्रमाणेच सूत्रबध्द पध्दतीने लढवली. ते कुठेही गाफील राहिले नाहीत. त्यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साह जागवला. त्याचे सकारात्मक परिणाम या विजयातून स्पष्ट होतात.
मतदार संघात विविध विकासकामांचे उदघाटन करण्यासाठी गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री किमान सात ते आठ वेळा आले होते. त्यांच्या आगमनानंतर दिलेल्या विविध विकास योजनांही गती मिळाली आहे. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यानंतर रावसाहेब दानवे यांना ६ लाख ९४ हजार ९४५ ही ईव्हीएमची मते मिळाली तर ३ हजार ७४ पोस्टल मतदान मिळाले, असे एकूण ६ लाख ९८ हजार १९ मते मिळाली आहेत. तर औताडेंना ८५६ पोस्टल मते मिळाली. एकूण ४ हजार ३१८ पोस्टल मते होती.
कासवगतीने मतमोजणीमुळे निकाल लांबणीवर
जालना लोकसभा मतदार संघामध्ये १२ लाख ३ हजार मतांची मोजणी करण्यात आली. ही मतमोजणी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाली. परंतु तांत्रिक अडचणींमुळे काहीना काही व्यत्यय मतमोजणीमध्ये येत होता. जालन्याशेजारील परभणी, बीड, औरंगाबाद या मतदार संघाची मोजणी साधारणपणे ७ वाजेपर्यंत संपली होती. परंतु जालना लोकसभा मतदार संघाची मोजणी तब्बल १६ तास चालली. रात्री १२ वाजेपर्यंत पोस्टल मतांची मोजणी झालीच नव्हती. विजयी उमेदवार रावसाहेब दानवे आणि त्यांचे समर्थक हे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ११.३० वाजता मतमोजणी केंद्रावर पोहोचले होते. असे असतानाही पोस्टल मतांची मोजणी सुरूच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रमाणपत्र देण्यासही विलंब झाला. ही मतमोजणी कुठल्या कारणामुळे लांबणीवर पडत होती, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.


Web Title: Danwe's easy win by 3 lakh 32 thousand votes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.