CoronaVirus : जालनेकरांना दिलासा ! दोन्ही कोरोनाग्रस्त महिलांचे स्वॅब निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:45 PM2020-04-27T19:45:20+5:302020-04-27T19:47:23+5:30

आरोग्य विभागाची पथके त्यांची नियमित तपासणी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आव आणत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे.

CoronaVirus: Consolation to Jalnekar! Swab negative of both corona positive women | CoronaVirus : जालनेकरांना दिलासा ! दोन्ही कोरोनाग्रस्त महिलांचे स्वॅब निगेटिव्ह

CoronaVirus : जालनेकरांना दिलासा ! दोन्ही कोरोनाग्रस्त महिलांचे स्वॅब निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ९१६ संशयित ६५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह५०२ जणांना डिश्चार्ज

जालना : कोरोनाग्रस्त दोन्ही महिलांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यात आजही ९१६ कोरोना संशयित असून, त्यातील ६५७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात २७३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाची पथके त्यांची नियमित तपासणी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आव आणत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे.

कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्याच धर्तीवर जिल्हा सीमा बंदी, अत्यावश्यक आस्थापना वगळता इतर दुकाने बंद, सार्वजनिक वाहतुकीला बंदीसह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेही बाजारात होणारी गर्दी पाहता वैद्यकीय सेवेशी निगडीत व्यवसाय वगळता इतर व्यवसायिकांना दुपारी २ नंतर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रविवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिकांचे सहकार्य आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना यशही मिळाले आहे. 

जालना शहरातील दु:खीनगर भागातील कोरोनाग्रस्त महिलेचा आणि परतूर तालुक्यातील शेलवडा येथील कोरोनाग्रस्त महिलेचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह जिल्हावासियांना कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी प्रशासकीय आकडेवारीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ९१६ आहे. कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या ७९३ पैकी ७५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, चार स्वॅब रिजेक्ट करण्यात आले आहेत. तर पुर्नपडताळणीसाठी १०४ नमुने पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे संस्थात्मक विलगीकरण कक्षात तब्बल २७३ जणांना ठेवण्यात आले असून, आरोग्य विभागाची पथके दिवसातून दोन वेळेस संबंधितांची आरोग्य तपासणी करीत आहेत.
मुंबई, पुण्यासह शेजारील औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यात वाढणारी रूग्णांची संख्या आणि जालना जिल्ह्यात असलेले संशयित रूग्ण पाहता जालनेकरांनी अहवाल निगेटिव्ह आल्याने निश्चिंत न राहता प्रशासनाने दिलेल्या सर्वच सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर न पडणे, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करणे, सतत हात धुणे, बाहेर फिरताना मास्क वापरणे, बाहेरून घरी गेल्यानंतर हात धुणे शक्यतो अंघोळ करून घरात प्रवेश करणे यासह प्रशासनाने दिलेल्या सर्वच सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्याला खºया अर्थाने कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करण्याची  गरज आहे.

८३७ मजूर परतले
पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी गेलेले ८३७ मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात बीड जिल्ह्यातून ३६, पुणे जिल्ह्यातून ४५, सांगली जिल्ह्यातून २९९, कोल्हापूर जिल्ह्यातून १८२, सातारा जिल्ह्यातून २२४, सोलापूर जिल्ह्यातून ४९ तर लातूर जिल्ह्यातून दोन ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मजुरांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.

‘त्या’ जवानांचे अहवालही निगेटिव्ह
हिंगोली येथे गेलेल्या एसआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या कोरोनाबाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या जालना येथील नऊ जवानांना शनिवारी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी त्या जवानांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे
जिल्ह्यात नागरिक आणि सर्व यंत्रणांनी लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळविले आहे. कोरोनाग्रस्त दोन महिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी नागरिकांनी लॉकडाऊन कालावधीत दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्कता बाळगावी.
-रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी

नियम पाळा, अन्यथा कारवाई केली जाईल
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी लॉकडाऊन काळातील नियम सर्वांनीच यापुढे पाळायचे आहेत. पोलिसांचा बंदोबस्त दिवसरात्र राहणार आहे. यापुढील काळातही नागरिकांनी सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
-एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक

नागरिकांनी काळजी घ्यावी
कोरोनाग्रस्त महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संशयितांचे स्वॅब घेणे, त्यांच्यावर उपचार करण्याचे काम आरोग्य विभाग करीत आहे. नागरिकांनी गाफिल न राहता यापुढेही दक्षता घेणे गरजेचे आहे. सतत हात धुण्यासह इतर सूचनांचे पालन करावे.
-डॉ. एम.के.राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

Web Title: CoronaVirus: Consolation to Jalnekar! Swab negative of both corona positive women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.