पिंपळगाव, आन्वा मंडळांत ढगफुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:49 AM2019-11-03T00:49:07+5:302019-11-03T00:50:41+5:30

भोकरदन तालुक्यात पावसाचा कहर झाला असून, शनिवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तालुक्यातील ५५.२५ मिमी पाऊस झाला.

Clouds in Pimpalgaon, or Circles | पिंपळगाव, आन्वा मंडळांत ढगफुटी

पिंपळगाव, आन्वा मंडळांत ढगफुटी

Next

फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तालुक्यात पावसाचा कहर झाला असून, शनिवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तालुक्यातील ५५.२५ मिमी पाऊस झाला. पिंपळगाव (रे.) महसूल मंडळात तब्बल १४५ तर आन्वा मंडळात ८० व धावाडा मंडळात ६१ मिमी पाऊस झाला. शिवाय सिल्लोड तालुक्यातून येणाऱ्या अनेक नद्यांनाही पाणी आल्याने शेतशिवारात पाणी शिरले होते. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, जनजीवनही पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
भोकरदन तालुक्यात गत दोन दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. सिल्लोड तालुक्यातही पाऊस झाल्यामुळे पूर्णा, केळना, गिरजा, जुई या नद्यांना मोठा पूर आला. धामणा, रायघोळ नद्या दुथडी वाहत आहेत. काही ठिकाणी पुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. केळना नदीला आलेल्या पुरामुळे आव्हाना, गोकुळ, पेरजापूर, व आलापूर या चार कोल्हापुरी बंधाºयाच्या बाजुचा भराव वाहून गेला. त्यामुळे आव्हाना येथील कडुबा गावंडे, गोकुळ येथील उत्तम शेतकर, उत्तम पालोदे, पंडित शेरकर, विलास शेरकर, भिमराव शेरकर यांच्या २५ एकर शेतातील कपाशीचे पीक वाहून गेले. प्रल्हादपूर शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
केळना नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील म्हाडा कॉलनीकडून येणाºया नाल्याचे पाणी केळना नदीपात्रात न जाता ते मागेच थांबले. त्यामुळे तुळजाभवानी नगर व स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी आले होते. भोकरदन ते आलापूरकडे जाणाºया रस्त्याच्यामध्ये नळकांडी पुलावर गेल्या एक महिन्या पासून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा रस्ता बंदच असून, जाफराबाद पुलावरून आलापूर, उस्मानपेठ, गोकुळवाडी, सुभानपूर, प्रल्हादपूर, या गावातील नागरिकांना जावे लागत आहे.
केळना नदीचे पाणी शिरले शेतशिवारात
आव्हाना : भोकरदन तालुक्यात झालेल्या पावसामुळे आव्हानासह भिवपूर, गोकुळ, प्रल्हादपूर, पेरजापूर या गावांना केळना नदीच्या पुराचा फटका बसला. अनेकांच्या शेतात सात ते आठ फुटापर्यंत पाणी साचले होते. नदी पात्रालगत असलेल्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पेरजापूर गावालगत असलेल्या घरांना व मंदिराला पाण्याने वेढा घातला होता. तलाठी एस. एस. कुलकर्णी यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या पाण्यामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती अरुण गावंडे, कडुबा गावंडे, कौतिकराव ठाले, नाना तायडे, संतोष गावंडे, प्रकाश गावडे, सुरेश गावंडे आदी शेतकºयांनी दिली.
रायघोळ नदीत एक जण गेला वाहून
तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आला होता. त्याचवेळी मत्स्यबीज पाहण्यासाठी गेलेले गजानन आत्माराम खराटे (३३) हे पाण्याच्या प्रवाहात रायघोळ नदीत वाहून गेले.
सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याचे तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले. भोकरदन येथील अग्निशमन दलाचे पथक, परतूर येथील पथकही सायंकाळी शोधकार्यासाठी दाखल झाल्याचे गोरड म्हणाले.
४५ वर्षांनंतर ‘जुई’ला महापूर
दानापूर : परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे गत ४५ वर्षात प्रथमच जुई नदीला महापूर आला होता. या महापुरात शेतकºयांची पिके वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. जुई धरणाच्या उगमवरील उंडणगाव, गोळेगाव, सारोळा, आन्वा, आन्वा पाडा, जानेफळ, वाकडी, कुकडी, करजगाव, कल्याणी, कठोरा बाजार, मूर्तड आदी भागात शुक्रवारी रात्रीचा मोठा पाऊस झाला.
या पावसाने ४५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला असून, जुई धरणाच्या सांडव्यावरून दोन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील दानापूर, वडशेद, वडशेद नवे टाळकलस, निंबोळा, सिपोरा बाजार, बोरगाव आदी भागातील शेतकºयांची पिके वाहून गेली आहेत. दानापूर येथील मालन माणिक दळवी, अनंता एकनाथ दळवी, शेषराव भिका दळवी, रमेश हरी मोरे, जफर मुन्शी शेख, गफूर मुन्शी शेख, सलीम मुन्शी शेख यांच्यासह इतर अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पावसामुळे दानापूर ते वडशेद जुने, वडशेद नवे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. दानापूर येथील मालन माणिक दळवी, सुभाष सुंदरराव पवार, काळुबा राऊबा दळवी, नाना शामराव दळवी, शेषराव पवार आदींच्या घराच्या भिंती पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
जाफ्राबाद मार्गावरील वाहतूक बंद
भोकरदन शहरातील जाफ्राबाद रोडवरील केळना नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी तीन ते चार तासासाठी या पुलावरील वाहतूक बंद केली होती.
आठवडी बाजारादिवशीच वाहतूक बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. जाफ्राबाद पुलावर सपोनि लक्ष्मण सोन्ने व चार ते पाच पोलिस कर्मचारी ठाण मांडून होते. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: Clouds in Pimpalgaon, or Circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.