In the basement of the Inquiry Committee | चौकशी समितीचे तळ्यात-मळ्यात
चौकशी समितीचे तळ्यात-मळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या पंधरा दिवसांमध्ये समितीने सलग कामकाज न केल्याने चौकशी तळ्यात-मळ्यात होते की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
जालना येथील एका नागरिकाने जालना पालिकेतील कारभाराची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दखल घेत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी पाच सदस्यांच्या पथकाकडून जालना पालिकेची चौकशी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केली होती.
या पंधरा दिवसांमध्ये समितीतील अधिकारी हे केवळ तीन ते चार वेळा जालन्यात आले. त्यांनी गेल्या दहा वर्षातील निविदा प्रक्रिया तसेच दिलेले धनादेश, केलेली विकास कामे आणि त्याचा दर्जा तपासणीसाठी रेकॉर्डची मागणी पालिकेकडे केली. त्यामुळे ही चौकशी अत्यंत बारकाईने आणि गतीने होईल, अशी अपेक्षा होती. ती रेंगाळली आहे.
दरम्यान, पालिकेची ही चौकशी राजकीय दृष्टीकोनातून केली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप असून, या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा दवा केला जात आहे.
शिवसेना-भाजपा युतीच्या काळातील कामकाजाचीही चौकशी या समितीने करावी, अशा आशयाची मागणी सत्ताधाऱ्यांकडून थेट नगर पालिका संचालकांकडे करण्यात आली आहे.
पथक आलेच नाही
पालिकेबाबत आलेल्या तक्रारीनुसार तपासणी करण्यासाठी बुधवारी पथक येणार होते. मात्र, या पथकाने बुधवारी होणा-या तपासणीकडे पाठ फिरविली. पथक बुधवारी आले नसल्याच्या घटनेला पालिकेतील सूत्रांनीही दुजोरा दिला.


Web Title: In the basement of the Inquiry Committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.