चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:35 AM2020-06-10T09:35:07+5:302020-06-10T09:37:40+5:30

गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली.

xi jinping appoints rising star among new army generals to head troops for india china border | चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

Next
ठळक मुद्देपूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे.  सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिका-यांची एक महत्त्वाची बैठक झाली.

बिजिंग - गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. 

दरम्यान, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. मात्र, चीनने राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी नवीन कमांडर लेफ्टनंट जनरल शु किलिंग यांना पाठवले आहे. भारत-चीन सीमेसाठी ते वेस्टर्न थिएटर कमांडची जबाबदारी पार पाडणार आहेत.

भारत-चीन सीमेवर तणाव वाढला होता. त्याचवेळी म्हणजेच 5 जून रोजी जनरल शु किलिंग यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जनरल शु किलिंग यांना वेस्टर्न थिएटर कमांडच्या सैन्याचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ज्याठिकाणी भारत-चीन यांच्यात सीमेवरून वाद-विवाद कायम आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने सैन्याच्या सुत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, “सीमा वादावरून भारताशी तणाव वाढत असताना, या संवेदनशील वेळेत वेस्टर्न कमांडमधील सैन्य व अधिकाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी एका तरुण कमांडरची आवश्यकता आहे.” दरम्यान, जनरल शु किलिंग 57 वर्षांचे आहेत. त्यांचे वय आधीच्या कमांडरपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे. तसेच, यापूर्वी शू किलिंग यांनी वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये काम केले होते. 

दरम्यान, सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिका-यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झाले. मात्र, यानंतर सोमवारी चीनने कोणतीही सकारात्मक पावले टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करीत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. 

गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीनने सैन्य हटवल्याने भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले.
 

Web Title: xi jinping appoints rising star among new army generals to head troops for india china border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन