भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:27 AM2020-01-20T04:27:55+5:302020-01-20T04:28:34+5:30

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे

Why India enacted 'CAA' law - Sheikh Hasina | भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

Next

दुबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, हे मान्य केले तरी भारताने या अनावश्यक गोष्टी का कराव्यात हे अनाकलनीय आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.

शेख हसीना सध्या संयुक्त अरब अमिरातींच्या दौऱ्यावर आहेत. ‘सीएए’वरून सध्या भारतात सुरू असलेल्या विरोधाच्या संदर्भात विचारता ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे, असे भारत सरकारने वारंवार सांगितले आहे व गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदी यांनी मला तसे आश्वासनही दिले आहे.

तरीही या गोष्टी भारत सरकार काय करीत आहे? त्याची काही गरज नव्हती, अशी पुस्तीही शेख हसीना यांनी जोडली. बांगलादेशच्या एकूण १६.१ कोटी लोकसंख्येत १०.७ टक्के हिंदू व ०.६ टक्के बौद्ध आहेत व तेथून धार्मिक छळामुळे लोक भारतात जातात याचे बांगलादेशने खंडन केलेले आहे. शेख हसीना म्हणाल्या की, लोकांनी भारतातून बांगलादेशात उलटे स्थलांतर केल्याच्या नोंदी नाहीत. मात्र, भारतातील भारतात लोकांना त्रास सोसावा लागत आहे; पण हीसुद्धा भारताची अंतर्गत बाब आहे. औपचारिकपणे बांगलादेशाने ही भूमिका घेतली असली तरी भारतातील या दोन्ही घडामोडींवरून तेथे बरीच अस्वस्थता आहे.

ही भारताची अंतर्गत बाब असली तरी त्याचा परिणाम शेजारी देशांवरही होऊ शकतो, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बोलून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर ‘सीएए’ मंजूर झाल्यानंतर बांगलादेशच्या तीन मंत्र्यांनी भारताचे नियोजित दौरे रद्दही केले
होते. पंतप्रधान शेख हसीना मात्र या मुलाखतीत म्हणाल्या की, सध्या भारत व बांगलादेशचे संबंध सर्वोत्तम आहेत व दोन्ही देशांमध्ये व्यापक पातळीवर सहकार्य सुरू आहे.

Web Title: Why India enacted 'CAA' law - Sheikh Hasina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.