तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:31 IST2025-12-09T10:30:42+5:302025-12-09T10:31:23+5:30
थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये सीमावाद तर सुरू आहेच, पण त्यासोबतच ९०० वर्ष जुन्या शिव मंदिरावरून देखील दोन्ही देश आपापसांत भिडताना दिसतात.

तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
जगातील असे दोन देश, जे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत, त्यांच्यात एका शिव मंदिरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला की, दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्ध पुकारले आहे. दोन्ही देशातील सीमावादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कंबोडियाने थायलंडचा एक सैनिक मारला, तर थायलंडने कंबोडियावर एअर स्ट्राईक केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धविराम घडवून आणला होता. मात्र, अवघ्या ४५ दिवसांतच तो मोडला आहे.
थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये सीमावाद तर सुरू आहेच, पण त्यासोबतच ९०० वर्ष जुन्या शिव मंदिरावरून देखील दोन्ही देश आपापसांत भिडताना दिसतात. डांगरेक पर्वताच्या माथ्यावर वसलेले प्राचीन प्रेह विहार मंदिर आता केवळ धार्मिक स्थळ राहिलेले नाही, तर ते आता थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वादाचे केंद्र बनले आहे.
पुरातन शिव मंदिर पण वादामुळे...
११ व्या शतकातील हे सुंदर हिंदू मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. परंतु, सभोवतालच्या जमिनीमुळे या मंदिराला वारंवार लष्करी संघर्षांना तोंड द्यावे लागले आहे. या परिसरातील हजारो लोक विस्थापित झाले आणि प्रकरणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेली. अलिकडच्या काही महिन्यांत, थायलंडच्या सैन्याने १०० हून अधिक कंबोडियन सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. दरम्यान, कंबोडियाने २१ सैनिकांचा मृत्यू, ५० नागरिक जखमी आणि ३,००,००० हून अधिक विस्थापित झाल्याची नोंद केली आहे.
मंदिरावरून का सुरू आहे वाद?
थायलंड आणि कंबोडिया मधील हा वाद १९०७ पासून सुरू आहे. फ्रेंच राजवटीत, फ्रान्सने एक नकाशा काढला, ज्यामध्ये प्रेह विहार मंदिर कंबोडियाच्या सीमेत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावेळी थायलंडने या नकाशावर आक्षेप घेतला नव्हता. परंतु काही दशकांनंतर, हा निर्णय दोन्ही देशांसाठी समस्या बनला. थायलंड हा देश आता असा युक्तिवाद करतो की, १९०७चा फ्रेंच नकाशा १९०४च्या कराराकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामध्ये असे म्हटले होते की सीमा डांगरेक पर्वतांच्या नैसर्गिक पाणलोट रेषेनुसार काढली पाहिजे. थाई अधिकाऱ्यांच्या मते, जर पाणलोट रेषेचा विचार केला तर, मंदिर थायलंडच्या हद्दीत येते. दोन्ही देश आता मंदिराला त्यांच्या सीमेत असल्याचे महत आहेत.
आयसीजेने कंबोडियाच्या बाजूने दिला निकाल!
१९६२ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला आणि मंदिरावरील त्यांचे सार्वभौमत्व मान्य केले. थायलंडला त्यांचे सैन्य मागे घेण्याचे आणि त्या ठिकाणाहून घेतलेल्या कोणत्याही कलाकृती परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयामुळे थायलंडमध्ये संताप निर्माण झाला आणि तेव्हापासून हे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणावाचे कारण बनले आहे. परंतु, न्यायालयाच्या निर्णयामुळे एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहिला, तो म्हणजे मंदिराभोवतीचा ४.६ चौरस किलोमीटरचा परिसर कोणाचा आहे?
२००८ मध्ये पुन्हा वाद भडकला!
२००८ मध्ये जेव्हा कंबोडियाने प्रेह विहार मंदिराची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी केली तेव्हा हा वाद पुन्हा पेटला. थायलंडने या निर्णयाला तीव्र विरोध केला, कारण यामुळे मंदिराच्या सभोवतालच्या परिसरावर कंबोडियन नियंत्रण वैध ठरेल अशी भीती होती. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान थाई आणि कंबोडियन सैन्यात अनेक हिंसक संघर्ष झाले. या लढाईत मोर्टार आणि रॉकेटचा मारा झाला, ज्यामध्ये किमान २० लोक ठार झाले आणि हजारो लोक विस्थापित झाले.
या संघर्षानंतर, कंबोडियाने २०११ मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि १९६२ च्या निकालाचे स्पष्टीकरण मागितले. २०१३ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुन्हा एकदा मंदिर कंबोडियाचे असल्याचे मान्य केले आणि थायलंडला या भागातून आपले सैन्य मागे घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाने असेही घोषित केले की, मंदिराच्या सभोवतालचा परिसर देखील कंबोडियन सार्वभौमत्वाखाली येतो. मात्र, थायलंडने भविष्यातील वादांमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पुढील हस्तक्षेप नाकारला आणि म्हटले की, उर्वरित सर्व सीमा समस्या द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे सोडवल्या जातील.
दोन्ही देशांसाठी मंदिर इतके का महत्त्वाचे?
कंबोडियन लोकांसाठी, प्रेह विहार मंदिर हे ख्मेर वारसा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. देशाच्या इतिहासातील हे सर्वात आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वास्तूंपैकी एक मानले जाते. हे मंदिर त्यांच्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा आहे. तर, थायलंडसाठी, हा वाद फक्त जमिनीचा नाही. राष्ट्रवादी गट या प्रदेशाला त्यागलेला प्रदेश मानतात.
पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचला वाद!
थायलंड-कंबोडिया सीमा वाद इतका वाढला आहे की, थायलंडच्या पंतप्रधानांना आपले पद सोडावे लागले. गेल्या महिन्यात थायलंड-कंबोडिया सीमेवरील वादादरम्यान, थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि माजी कंबोडियन पंतप्रधान हुन सेन यांच्यातील १७ मिनिटांचा फोन कॉल लीक झाला होता. लीक झालेल्या कॉलमध्ये पतोंगटार्न यांनी हुन सेन यांना "काका" असे संबोधले आणि काही थाई लष्करी कमांडर आक्रमक असल्याचे म्हटले. यामुळे थायलंडमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. व्यापक निदर्शने झाली आणि लष्कर समर्थक आणि राजेशाही समर्थक गट संतप्त झाले. सर्वात मोठा धक्का तेव्हा लागला जेव्हा सरकारचा सर्वात मोठा सहयोगी भूमजैथाई पक्ष युतीतून बाहेर पडला आणि सरकार अल्पमतात आले. लष्करानेही याला राष्ट्रीय सन्मानाचा अपमान मानले, ज्यामुळे राजकीय दबाव आणखी वाढला. परिणामी, २९ ऑगस्ट रोजी पतोंगटार्न यांना पदावरून काढून टाकण्यात आले.