पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:22 IST2025-12-02T11:20:59+5:302025-12-02T11:22:22+5:30
संसदेचे तातडीने अधिवेशन बोलावून या सर्व पाऊलांना कायदेशीर मान्यता देण्याची तयारी आहे.

पाकिस्तानात आज अचानक काय घडतंय?, राष्ट्रपतींनी बोलावली संसदेची बैठक; शहबाज परदेशातून परतले
इस्लामाबाद - पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची २ डिसेंबरला आपत्कालीन बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या निगडित ही बैठक बोलवल्याचे बोलले जाते. राष्ट्रपतींच्या निरोपानंतर परदेश दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान शहबाज शरीफ सोमवारी रात्री इस्लामाबादला परतले. संसदेच्या या अधिवेशनात पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध, सीमा ऑपरेशन आणि बलूचिस्तान तथा खैबर पख्तूनख्वा परिसरात सुरक्षा व्यवस्थेसह राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तर संसदेची ही आपत्कालीन बैठक बोलवण्यामागे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचा हात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
रिपोर्टनुसार, मुनीर जरदारी यांच्यासोबत मिळून नवीन कमांड ढाचा बनवू इच्छितात. इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाची सत्ता असणाऱ्या खैबर पख्तूनख्वा येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे. खैबर प्रांतात राष्ट्रपती राजवट लागू करून पाकिस्तानी सैन्याला तालिबानीकडून होणाऱ्या लाजिरवाण्या पराभवापासून वाचायचे आहे. शहबाज शरीप यांचं तातडीने देशात परतणे, असीम मुनीर यांच्याबाबत नोटिफिकेशन जारी होणे आणि संसदेची आपत्कालीन बैठक बोलवणे हा सगळा संयुक्त प्रयत्नांचा भाग आहे असं बोलले जाते.
इमरान खान यांच्या पक्षाला सत्तेतून हटवण्याची तयारी
जरदारी, मुनीर आणि शहबाज शरीफ या तिघांना खैबर प्रांतात इमरान खान यांच्या पक्षाला आवरण्याची रणनीती आखायची आहे. त्याशिवाय गाझामध्ये सैन्य तैनाती, अमेरिकेसोबत खनिज डिलसारख्या मुद्द्यांवरही चर्चा होईल. या बैठकीत खैबर प्रांतात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याठिकाणी काय धोरणांवर काम करावे लागेल यावर चर्चा होईल. पुढील २४ तासांत चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसबाबत नोटिफिकेशन जारी केले जाऊ शकते.
दरम्यान, संसदेचे तातडीने अधिवेशन बोलावून या सर्व पाऊलांना कायदेशीर मान्यता देण्याची तयारी आहे. संसदेच्या बैठकीच्या मागून राजकीय वाद टाळण्याची आणि इमरान खान यांच्या पक्षाला सत्तेतून हटवण्याची तयारी आहे. इमरान खान यांच्याबाबत संयुक्त राष्ट्रातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. खैबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानसोबत वादाचा हवाला देत आहे. गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती आहे.