...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:13 PM2020-01-08T19:13:08+5:302020-01-08T19:14:00+5:30

इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही.

War against Iran in Not easy to United States, Know why? | ...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

googlenewsNext

इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने शुक्रवारी ड्रोन हल्ला करून हत्या केली होती. या घटनेनंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सुलेमानींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या इराणमधील तळांवर हल्ला करत इराणने आपले इरादेही स्पष्ट केले आहेत. एकीकडे इराणने आक्रमक भूमिका घेतली असली आणि इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही आहे. त्यामुळे आततायीपणा करून अमेरिकेने इराणविरोधात युद्धाची घोषणा केल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान आणि इराकपेक्षा अधिक फजिती होऊ शकते. त्याची कारणेही तशीच आहेत. 


अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. मात्र गेल्या शुक्रवारी अमेरिकेने इराणच्या कुद्स फोर्सचे कमांडर कासिम सुलेमानी यांची हत्या करून दोन्ही देशातील युद्धाला अप्रत्यक्षपणे सुरुवात केली आहे, असे जगभरातील संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेने यापूर्वी 2001 मध्ये  9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानवर आणि संहारक शस्त्रे बाळगल्याची शंका असल्याने 2003 मध्ये इराकवर हल्ला केला होता. मात्र जवळपास दोन दशके उलटत आली तरी तेथील परिस्थिती निवळणे अमेरिकेला शक्य झालेले नाही. त्यातच क्षेत्रफळ, आर्थिक क्षमत, सैन्यशक्ती आणि भौगोलिक स्थान यांचाय विचार करता इराण या दोन्ही देशांपेक्षा कैकपटीने बलाढ्य आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम भयावह असू शकतात. 

इराणच्या नकाशावर नजर टाकल्यास त्या देशाचे वैशिष्ट्यपूर्ण असे भौगोलिक स्थान दिसून येते. इराणच्या एका बाजूस पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्थान असे देश आहेत. तर दुसऱ्या बाजूस अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की, इराक असे देश आहेत. वर कॅस्पियन समुद्र तर खाली पर्शियन आखात आणि येमेनचे आखात आहे. याच भागात  होर्मुझची सामुद्रधुनी ((Strait of Hormuz) नावाचा भाग आहे. या भागावर इराणचे पूर्ण वर्चस्व असून, इराणी नौदलाने नाकेबंदी केल्यास जगाला होणारा 30 टक्के खनिज तेलाचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो.

तसेच इराणचे क्षेत्रफळही मोठे असून, त्याच्या काही भागात मोठी वाळवंटे तर बहुतांश भाग पर्वतरांगांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथे मैदानी युद्ध लढणे कठीण आहे. सोबतच या पर्वतरांगांमधील नैसर्गिक आणि मानवनिर्मित गुहांचा वापर इराणी सैन्याकडून युद्धात होण्याची शक्यता आहे. ही बाब युद्धावेळी महत्त्वपूर्ण ठरू शकते. 

पारंपरिक युद्धपद्धतीचा विचार केल्यास इराण जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेची कुठल्याही बाबतीत बरोबरी करू शकत नाही. पण आपल्या मर्यादा विचारात घेऊन इराणने वेगळ्या पद्धतीची रणनीती आखली आहे. त्यामुळे आखाती भागात अमेरिकेच्या हितसंबंधांना मोठ्या प्रमाणावर धक्का बसू शकतो. 


इराणच्या सैन्यशक्तीचा विचार केल्यास इराणकडे लष्कर, हवाई दल आणि नौदल अशी भक्कम सुरक्षा यंत्रणा आहे. इराणच्या लष्करात 5 लाख 23 खडी आणि 3 लाख 50 हजार राखीव सैन्य आहे. इराणच्या हवाई दलाकडे 741 विमाने असून, सर्वात मोठ्या हवाई दलांमध्ये त्यांचा नववा क्रमांक लागतो. इराणकडे प्रबळ नौदल आहे. या नौदलाचे पर्शियन आखात आणि येमेनच्या आखातात वर्चस्व आहे. तसेच आपल्याकडील पाणबुड्यांच्या जोरावर या भागातून होणाऱ्या रहदारीस इराणी नौदल खंडीत करू शकते. 

 इराणने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. इराणकडील क्षेपणास्त्रांपैकी त्यांनी देशाबाहेरील त्यांच्या प्रॉक्सी सैन्याकडेही दिलेली आहेत. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह नामक प्रॉक्सी ग्रुपकडे इराणच्या 1 लाख 30 हजार रॉकेटांचा साठा आहे. त्यामुळे इराणविरोधात युद्धाची घोषणा करताना अमेरिकेला वरील बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मात्र अमेरिका इराणविरोधात सैन्य कारवाई करणार नाही, हे सांगणे नेहमीच टाळत आली आहे. कारण त्यामुळे इराणवरील दबाब कमी होऊ शकतो. 

सर्वात गंभीर बाब म्हणजे अमेरिका आणि इराममध्ये युद्धाला औपचारिकपणे तोंड फुटल्यास हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही. मध्य पूर्वेतील इराणचे शत्रू देश असलेले सौदी अरेबिया आणि इस्राइल हे इराणविरोधात अमेरिकेला साथ देतील. तर सीरिया, येमेन, लेबेनॉन हे इराणचे मित्र इराणच्या बाजूने उभे राहतील. त्यानंतर आखाती भागात हितसंबंध गुंतलेल्या देशांपैकी रशिया, चीनसारखे देशही त्यात उडी घेतील. इराण  आणि अमेरिका अशा दोन्ही देशांशी चांगले संबंध असलेल्या भारतालाही निश्चित भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे या युद्धाचे परिणाम गंभीर होतील. त्यामुळेच इराण आणि अमेरिकेतील सध्याच्या तणावाने जगभरात चिंता वाढवली आहे. 

Web Title: War against Iran in Not easy to United States, Know why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.